पान २
शेकोटी ठरली आधार : वन्यप्राण्यांच्या धुडगुसावर नियंत्रण
गुरुकुंज (मोझरी) : वन्यप्राण्यांचा हैदोस थांबविण्यासाठी व शेतातील साहित्य चोरीला जाऊ नये, म्हणून अनेक शेतकरी रात्री आपल्या शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी शिवारात शेकोटीच्या साह्याने रात्र जागून काढत आहे.
काही दिवसांपासून अप्पर वर्धा कालव्याला पाणी सोडले आहे. शेंदूरजना बाजार शिवारात मोठ्या प्रमाणात ओलित सुरू आहे. त्यामुळे बहुतांश शिवारात मोठ्या प्रमाणात शेती अवजार आजूबाजूच्या परिरात पडून आहेत. त्यामध्ये तुषार सिंचनाचे पाईप, मोटारपंप, डिझेल इंजिन, स्टार्टर आदी साहित्यांचा समावेश आहे. आधी नागरी वस्तीत चोरीच्या चार घटना घडल्या. आता शेतातील अवजार चोरीला जात आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. तिवसा तालुक्यात बिबट्या, वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्यामुळे भयभीत झालेले शेतकरी आता जीवाची पर्वा न करता ट्रॅक्टरच्या ट्रॉली, बैलबंडीच्या साहाय्याने संघटित होऊन रक्षण करीत आहे.