शेतकरी उत्पादित मालाची थेट ग्राहकांना विक्री
By Admin | Updated: May 3, 2017 00:18 IST2017-05-03T00:18:24+5:302017-05-03T00:18:24+5:30
सध्याची बाजार व्यवस्था मध्यस्थ दलालांच्या साखळीमुळे खिळखिळी झाली आहे.

शेतकरी उत्पादित मालाची थेट ग्राहकांना विक्री
धान्य महोत्सव : ग्राहकांना मिळतेय विनाभेसळ धान्य, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न
अमरावती : सध्याची बाजार व्यवस्था मध्यस्थ दलालांच्या साखळीमुळे खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अशी संकल्पना जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘फ्रेंड्स फॉर फ्रेंड्स’ या संस्थेने शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी २९ एप्रिलपासून गर्ल्स हायस्कूल चौकातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या आवारात ‘धान्य महोत्सव’ आयोजित केला आहे. हा महोत्सव ५ मे पर्यंत चालणार आहे.
शासनाचे कुठलेच अनुदान न घेता शेतकऱ्यांनी केलेल्या नैसर्गिक उत्पादनांची ग्राहकांपर्यंत थेट व किफायतशीर भावात विक्री व्हावी, हा धान्य महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. यापूर्वी आयोजित तांदूळ महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याच धर्तीवर आता धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अलिकडे शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केला जातो.
दलाल साखळीला ब्रेक
अमरावती : शेतमालाची मूळ चव नाहीशी होत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी अद्यापही नैसर्गिक शेतीचा वारसा जपला आहे.
वरूड तालुक्यामधील जायगाव येथील विजय पेलागडे यांनी नैसर्गिक शेतीमधून पिकविलेली डाळिंब विक्रीसाठी आणली आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील शंकर बोरीकर यांनी पिकविलेला सुगंधी ५५५ व बासमती तांदूळ, भंडारा जिल्ह्यातील सालेवाडी येथील कुशन टिचकुले यांच्या शेतातील चिकेट खंड्या व केसर तांदूळ, नांदगावातील मोरगाव येथील अनंत खंडारकर यांच्या शेतीमधील हळद, टाकरखेडा संभूतील अभिजित देशमुखांच्या शेतीमधील तूर डाळ, अमरावतीच्या श्रीकृष्ण घाटे यांनी गृह उद्योगातून तयार केलेले ११ प्रकारचे सरबत, आवळ्याचे विविध प्रकार, गुलकंद, कृषी समृद्धी शेतकरी कंपनीद्वारा गहू, डाळ व ज्वारी, मौदा येथील संजय ढोबळे यांच्या शेतीमधील चिन्नोर, जय श्रीराम व बासमती तांदूळ, उस्मानाबादच्या फारूक पटेल यांची गावरान ज्वारी, सिंदखेड राजा येथील प्रशांत काळबेंडे यांची न्यूसेलर वाणाची मोसंबी, भंडाऱ्याच्या इंदल बडवाईक यांच्या शेतीमधील ब्राऊन राईस व श्रीराम तांदूळ व अचलपूरच्या गौरव वानखडे यांच्या शेतामधील गावरान मूग, उडीद डाळ व बरबटी आदी उपलब्ध आहे. दलालमुक्त साखळी व शेतकऱ्यांच्या मालाची ग्राहकांना थेट विक्री ेकेल्यामुळे शेतकऱ्यांना व ग्राहकांना समान फायदा होत आहे. (प्रतिनिधी)
झुणका-भाकर स्टॉलला अमरावतीकरांची दाद
धान्य महोत्सवात धान्य, फळांसोबतच झुणका-भाकरचे देखील स्टॉल आहेत महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध ज्वारीची भाकर आणि झुणका, दह्याचे बेसन, हिरव्या मिरच्यांचा ठेचा असा झणझणीत वऱ्हाडी थाट असणाऱ्या याकेंद्राला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. विशेष म्हणजे या केंद्रात भाकरीसोबत भाज्यांचे मेन्यू रोज बदलतात त्यामुळे दररोज वेगळ्या भाजीची चव ग्राहकांना थाटता येत आहे.