बांबू व्यवसायातून शेतकऱ्यांची समृद्धी

By Admin | Updated: January 2, 2017 01:08 IST2017-01-02T01:08:09+5:302017-01-02T01:08:09+5:30

बांबू प्रजातीचे संवर्धन व संगोपन बांबू शेतीपूरक व्यवसाय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

Farmer's prosperity through bamboo business | बांबू व्यवसायातून शेतकऱ्यांची समृद्धी

बांबू व्यवसायातून शेतकऱ्यांची समृद्धी

प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन : वडाळीतील बांबू उद्यानाचे लोकार्पण
अमरावती : बांबू प्रजातीचे संवर्धन व संगोपन बांबू शेतीपूरक व्यवसाय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बांबू व्यवसायसुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीकडे नेणारा ठरू शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे मध्यवर्ती रोप वाटिकेतील वडाळी बांबू उद्यानाचे लोकार्पण सोहळ्यानिमीत्त केले.
रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वडाळी वनविभाग कार्यालय परिसरातील मध्यवर्ती रोप वाटिकेजवळील नवनिर्मित बांबू उद्यानाचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर आ. सुनील देशमुख, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक मसराम, नगरसेविका सपना ठाकूर उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात पालकमंत्री म्हणाले की, देशभरातील बांबू प्रजातीपैकी या बांबू उद्यानात ६३ प्रजाती आहेत. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व देखणे हे बांबू उद्यान अमरावतीच्या वैभवात भर टाकणारेच आहे. ते उद्यान रविवारी अमरावतीकरांसाठी खुले झाले असून या उद्यानातच कॅक्टस उद्यानसुद्धा आहे. हे उद्यान नवीन वर्षानिमित्त नागरिकांना भेट असल्याचे सांगून बांबू उद्यान निर्मितीत परिश्रम घेणाऱ्या वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर, सलीम व राऊत यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. संचालन पक्षी अभ्यासक यादव तरटे, प्रास्ताविक उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना, तर आभार वडाळी वनपरिक्षेत्राचे एच.व्ही. पडगव्हाणकर यांनी केले. यावेळी कॅक्टस गार्डन विकसित करणारे किशोर राऊत, बांबू गार्डनसाठी श्रम घेणारे सैय्यद शेख सलीम, वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने, पक्षीअभ्यासक जयंत वडतकर, वन्यजीवप्रेमी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's prosperity through bamboo business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.