करजगावच्या तलाठ्याला शेतकऱ्यांनी बदडले
By Admin | Updated: July 12, 2014 23:26 IST2014-07-12T23:26:13+5:302014-07-12T23:26:13+5:30
तालुक्यात गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये वरिष्ठांकडे तलाठ्यांच्या तक्रारी

करजगावच्या तलाठ्याला शेतकऱ्यांनी बदडले
वरूड : तालुक्यात गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये वरिष्ठांकडे तलाठ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तलाठ्यांना घेराव घातला. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान करजगावच्या शेतकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वरुड पोलिसांनी जगदीश वानखडे, विजय दापुरकर, सतीश लांडगे, गजानन बहुरुपी, राहुल बहुरुपी, सचिन बहातकर, गौरव बहुरुपी, सुनील कुरवाळे सर्व रा. करजगाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१३ च्या जनू ते सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. जानेवारी २०१४ पासून फेब्रुवारी, मार्चपर्यंत गारपिटीच्या तडाख्याने संत्रा, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. विमा योजनाही फसवी निघाली. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये लोकसभा निवडणूक आणि मार्च अखेरच्या घाईगर्दीत वाटेल तशा याद्या तयार केल्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला. खचलेल्या विहिरींच्या अनुदानाकरिता पंचनामे करताना तलाठ्यांनी लाच घेतली. यामुळे ेशेतकऱ्यांचा असंतोष वाढतच गेला. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत कुठे तलाठ्याला घेराव तर कुठे ओढाताण करण्याचे प्रकार घडले.
शुक्रवारी करजगावच्या तलाठ्याला शेकडो शेतकऱ्यांनी घेराव घालून मारहाण केल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. करजगाव (गांधी घर) येथे गारपीटग्रस्तांच्या कमी-अधिक अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची काही नावे यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. खचलेल्या विहिरींच्या अनुदानाकरिता पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून रक्कम उकळण्याचा गोरखधंदा करणाऱ्या तलाठ्याबद्दल रोष अनावर झाल्याने शेतकऱ्यांनी चोप दिल्याची माहिती आहे. महसूल अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. शेतकऱ्यांवर निसर्गाने केलेला अन्याय आणि प्रशासनाकडून त्यांची होेणारी हेळसांड लक्षात घेता शेतकऱ्यांची स्थिती किती विदारक आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच शेतकऱ्यांचा असंतोष आता उफाळून येऊ लागला आहे. (तालुका प्रतिनिधी)