शेतकरी आत्महत्या वाढल्या
By Admin | Updated: July 7, 2015 00:24 IST2015-07-07T00:24:55+5:302015-07-07T00:24:55+5:30
नापिकीचे सत्र, दुष्काळ यामधून वाढलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज यामुळे नैराश्य येऊन

शेतकरी आत्महत्या वाढल्या
धक्कादायक : मागील वर्षीच्या तुलनेत सहा महिन्यांत २६ आत्महत्या अधिक
अमरावती : नापिकीचे सत्र, दुष्काळ यामधून वाढलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज यामुळे नैराश्य येऊन जिल्ह्यातील १३० कर्जबाजारी शेतकऱ्यांनी २०१५ च्या सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीला मोड आल्यामुळे १ ते ५ जुलै या पाच दिवसांत आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे तर शुक्रवार ते शनिवार या २४ तासात २ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जिल्ह्यात जानेवारी ते ७ जून २०१५ दरम्यान १३० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी ८५ प्रकरणे निकषपात्र ठरली आहे. २० प्रकरणे अपात्र तर २५ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहे. मागील वर्षी २०१४ मध्ये २०९ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यापैकी १५६ प्रकरणे पात्र, ५३ प्रकरणे अपात्र ठरली होती.
१ जानेवारी ते ३० जून २०१४ या सहा महिन्याच्या कालावधीत १०२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या तुलनेत यंदा २०१५ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ७ जुलै २०१५ पर्यंत २ हजार ५२७ कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी ९१३ प्रकरणे पात्र आहेत. एक हजार ६०२ प्रकरणे अपात्र आहेत व २५ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहेत.
सन २०१५ मध्ये जानेवारी महिन्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फेब्रुवारी १५, मार्च १९, एप्रिल २३, मे २९, जून १९ व जुलैच्या ६ दिवसात आठ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जिल्ह्यात शुक्रवार ते रविवार या दोन दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. धामणगाव तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे शुक्रवारी, तिवसा तालुक्यामधील भिवापूर येथे शनिवारी व अमरावती तालुक्यामधील पिंपळविहीर येथे रविवारी शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आहे. पेरणीला मोड आल्यामुळे पुन्हा पेरणी कशी करावी या नैराश्यामधून शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केव्हा?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हाती घेताच शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात गतवर्षीपेक्षाही यावर्षी सहा महिन्यांत २६ शेतकऱ्यांच्या अधिक आत्महत्या झाल्या आहेत. जुलैच्या ५ दिवसांत ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मुळात शासनाने शेतकरी आत्महत्या हा विषयच गंभीरतेने घेतला नसल्याचा आरोप होत आहे. हाच का, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
यंदा अधिक आत्महत्या
जिल्ह्यात मागील वर्षी २०१४ मध्ये ३० जूनपर्यंत म्हणजेच सहा महिन्यांत ९६ कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्या तुलनेत १ जानेवारी ते ३० जून २०१५ या कालावधीत १२२ कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त झाल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे. सलग ३ वर्षे दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी.