शेतकऱ्यांची झुंज सुरुच
By Admin | Updated: May 16, 2015 00:38 IST2015-05-16T00:38:59+5:302015-05-16T00:38:59+5:30
दरवर्षी निसर्गात होत असलेला बदल, शासनाचे शेतीसंबंधी बदलत असलेले धोरण याचा परिणाम अनुकूल होण्या ऐवजी प्रतिकूल ...

शेतकऱ्यांची झुंज सुरुच
कधी संपणार हे दुष्टचक्र ? : शासन उदासीन, खरिपाचे वेध, सोयाबीन बियाण्यांची टंचाई
सुनील देशपांडे अचलपूर
दरवर्षी निसर्गात होत असलेला बदल, शासनाचे शेतीसंबंधी बदलत असलेले धोरण याचा परिणाम अनुकूल होण्या ऐवजी प्रतिकूल होत आहे. निसर्गाच्या बदलामुळे शेतकरीही बदलत असला तरी त्याचेपुढे रोज एक नवे संकट उभे राहत आहे. प्रत्येक वर्ष नव्या बदलांचे संकट उभे करीत असल्याने निसर्गासोबत आणखी किती काळ झुंज द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या संकटाचे आव्हान स्वीकारत शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला लागला आहे. बियाणे कंपन्यांनी आपला प्रचार जोरात सुरु केल्याने शेतकरी संभ्रमात आहे. दरम्यान यावर्षी सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
आधुनिकतेपायी शेतीतंत्र बदलले. त्या बदलांचा परिणाम शेतीवर झाला. उत्पादनखर्च कमालीचा वाढला येणाऱ्या उत्पन्नातून मेळ बसविणे कठीण झाल्याने त्याचा परिणाम कुटुंबावर होऊ लागला आणि पुढे त्याच्या जीवनावर झाला आहे. निसर्गाच्या बदलामुळे शेतकऱ्यांना इतर पिकांचा शोध घ्यावा लागला. अचलपूर, दर्यापूर, अंजनगांव, चांदूर बाजार, धारणी, चिखलदरा, इत्यादी तालुक्यात एकेकाळी जोमाने पिकणारी ज्वारी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. वनांचा होत असलेला ऱ्हास व वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चारा-पाण्यासाठी वन्यप्राणी शेतावर ताव मारत आहेत. शेतीपिके सुरक्षित नाही. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडावे लागले आहे. त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना शासनाकडे झालेली नाही. शासनाच्या औद्योगिक धोरणामुळे शेतमजुर दिवसेंदिवस कमी होत आहे. निसर्गाचा लहरीपणा वाढतो आहे. शासनाचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण आहे. या प्रकारामुळे शेती आणि शेतकरी मोठ्या संकटात गुंतत चालले आहे.
निसर्गाचा लहरीपणा, जंगली प्राण्यांचा पिकात धूडगूस, शासनाची उदासिनता आदी संकटांचे आव्हान स्विकारत अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीला लागला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूका आटोपल्यानंतर शेतकऱ्यांना आता खरिप हंगामाचे वेध लागले आहेत.
शेतात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने त्याचे बी विखुरले जाणार असल्याने यावर्षी शेतकऱ्यांना निंधणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागणार असल्याची शक्यता आहे.
मागील वर्षात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात अजुनही हिरवेकच गवत उभे आहे. पावसामुळे हे गवत काढले न गेल्याने त्याला ते आता बियांवर आले. त्याचे बीज पुन्हा जमिनीत पडून पहिल्याच पावसात शेतात तण उगवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी खते व बियाण्यांवरच महागड्या तणनाशकाचीही व्यवस्था करुन ठेवावी लागणार आहे. पावसाळ्याचा अवधी लक्षात घेता शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतात नांगरणी आटोपली आता वखारणीला सुरुवात झाली. शेतात पडलेला काडीकचरा उचलण्याची कामे युध्दपातळीवर सुरु आहे.
जमिनीची धूपच झाली नाही
जमिनीला कडक उन्हाची नितांत गरज असते. जमीन तापल्याशिवाय चांगली पिकत नाही हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षी तर प्रत्येकच महिन्यात कमी अधिक पाऊस आला व आभाळ राहिल्याने जमिनीला पाहिजे तसे तापमान मिळाले नाही. त्यामुळे यावर्षीही उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना व मे महिना असूनही पाहिजे तसा उन्हाळा न झाल्याने जमिनीची धूप झालेली नाही. जमीन तापलीच नाही तर पिकणार कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सोयाबीनमध्ये घट
अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा इत्यादी तालुक्यात गत हंगामात सोयाबीनचे दर्जेदार उत्पादन झाले नाही. त्याचप्रमाणे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. सदर पाच तालुक्यात प्रत्येकी २० ते २२ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. परंतु खरीप हंगामात वेळी अवेळी पाऊस झाल्याने सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. त्याचप्रमाणे काही भागात सोयाबीन सवंगणीच्या काळात पाऊस आल्याने सोेयाबीन खराब झाले होते. त्यामुळे यावर्षी बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पेरणीची लगबग
४मृगनक्षत्राच्या अगोदर रोहिणी नक्षत्र लागते. या नक्षत्रात मान्सूनपूर्व पेरणी केली जाते. सदर पाच तालुक्यात काही भागात ओलिताची व्यवस्था आहे. त्यासोबत मान्सूनपूर्व पेरणीची लगबग दिसून येते. त्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जातो. ओलिताची सोय असलेल्या शेतात सरी काढण्याचे काम सध्या सुरु आहे.
सोयाबीन बियाण्यांची संभाव्य टंचाई लक्षात घेता या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचे शोेषण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांची साठवण करुन ठेवणे आवश्यक आहे. जेणे करून फसवणूक होणार नाही.
- बाळासाहेब गणगणे,
प्रगतिशील शेतकरी.
रासायनिक खतांमुळे पोत खराब होऊन जमीन नापीक होत असल्याने शेतात शेणखत टाकल्यास जमिनीचा पोत सुधारतो. याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटल्याने तो शेणखतावर भर देतो. बहुतांशी शेतात शेणखताचे ढिगारे आहेत. शेणखत भरपूर प्रमाणात उपलब्ध व्हावे, शासनाने केलेल्या गोवंश हत्याबंदीच्या कायद्याचे हेही एक कारण आहे.
- श्रीधर क्षीरसागर,
युवा शेतकरी.
शेतकऱ्याचा लेकरु म्हणून उमेदवाराला मतदान न करता फक्त शेतकरी हीच जात ठरवून शेतकरी हिताचा निर्णय घेणाऱ्यांना निवडून द्यावे, भावनेत मत देणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बी- बियाणे, खत आदींसाठी आर्थिक मदत केली पाहिजे. शेतकरी पूरता डबघाईस आला आहे. मागील वादळी पावसाची नुकसान भरपाई अजूनपर्यंतही शेतकऱ्यांना मिळाली नाही.
- अतुल लकडे,
युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी.