मोर्शी (तालुका प्रतिनिधी) आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मोर्शी येथे आगमन झाले असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा तसेच मंत्रालयापर्यंत ठिय्या देण्याची तयारी ठेवा, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निश्चय करण्याचा कानमंत्र भाजपा कार्यकर्त्यांना दिला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शुक्रवारी मोर्शी येथे जयस्तंभ चौकात त्यांनी भेट दिली. त्यावेळी हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत, तर महिलांनी औक्षण करून व भाजपा भटक्या विमुक्त जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार रामदास तडस, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, भटक्या विमुक्त जाती मोर्चा अध्यक्ष कमलसिंग चितोडीया, अधिवक्ता सेल अध्यक्ष जयंत ढोले उपस्थित होते. मोर्शीकरांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. कुणाचे नाव न घेता शिवसेनेने कसा विश्वासघात केला तेही सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर कसा अन्याय चालविला, याचा पाढाच वाचला. डॉ.अनिल बोंडे यांनी केलेल्या कामाची चंद्रकांत पाटील यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. मोर्शी मतदारसंघात एवढे कार्य करणाऱ्या डॉ. बोंडे यांच्या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले. आताच्या सरकारने विदर्भातील संत्रा पिकाच्या पीक विमाबाबत वाढवलेली रक्कम कशी अन्यायकारक आहे, हेसुद्धा पटवून दिले. तसेच विदर्भातील संत्रा आणि मोसंबी याच्या गळती बाबत सरकारने कुठलीही मदत केली नाही तर आपल्या कृषी विभागामार्फत कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही. याबाबत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आणि महाविकास आघाडीने यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे अन्यायकारक पाऊल उचलले तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसावे प्रत्येक तहसीलवर आंदोलन करावे. तरीही सरकार जागे झाले नाही तर मुंबईला ठिय्या देऊ आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार, नाही तोपर्यंत माघारी फिरणार नाही, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष देव बुरंगे, शहराध्यक्ष रवी मेटकर, विधानसभा अध्यक्ष अजय आगरकर, नगरसेवक नितीन राऊत, अशोक ठाकरे, सुनील ढोले, मनोहर शेंडे, ज्योती प्रसाद मालविय, मनोज मोकलकर, उमेश कोंडे, शरद मोहोड, संजय गुलसे, सारंग खोडस्कर, सभापती विना बोबडे, यादव चोपडे, सुनील कडू, नीलेश शिरभाते, प्रमोदराव बोबडे, हरी गेडाम, गजानन मधपुरे, रमेश खातदेव, महिला आघाडीच्या लांजेवार, वर्षा काळमेघ, प्रभा फंदे, कल्पना पाखोडे, प्रतिभा राऊत, विद्या गेडाम, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण राऊत यांनी केले.