शेतकऱ्यांना दिसला वाघ वनविभागाला दिसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:53+5:30

वनविभाग मात्र बिनधास्त असल्याचे शेतकरी, शेतमजुरांचे म्हणणे आहे. शनिवार १६ नोव्हेंबरला पोही शिवारातील भरत लहाने यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजता दरम्यान फवारणीकरिता शेतात भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तो वाघ पाणी पिताना बाळू राऊत यांना दिसला. याची माहिती त्यांनी परतवाडा वनविभागाला दिली. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परतवाडा वनविभागाचे पथक रात्री ९ वाजताच्या दरम्यान पोही शेतशिवारात दाखल झाले.

The farmers did not see the tiger forest | शेतकऱ्यांना दिसला वाघ वनविभागाला दिसेना

शेतकऱ्यांना दिसला वाघ वनविभागाला दिसेना

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशत : वनविभाग बिनधास्त, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, शिंदी बु., जटांगपूर, पार्डी, वाल्मिकपूर, कामतवाडा, पोही शिवारात १७ दिवसांपासून वास्तव्यास असलेला वाघ त्याच परिसरातील दोन शेतकऱ्यांना दिसला आहे. तसा दावाही त्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांपुढे केल्याने परिसरातील शेतकरी दहशतीत आले आहेत.
वनविभाग मात्र बिनधास्त असल्याचे शेतकरी, शेतमजुरांचे म्हणणे आहे. शनिवार १६ नोव्हेंबरला पोही शिवारातील भरत लहाने यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजता दरम्यान फवारणीकरिता शेतात भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तो वाघ पाणी पिताना बाळू राऊत यांना दिसला. याची माहिती त्यांनी परतवाडा वनविभागाला दिली. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परतवाडा वनविभागाचे पथक रात्री ९ वाजताच्या दरम्यान पोही शेतशिवारात दाखल झाले. त्यांनी पाणी पिणाºया वाघाची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून घेतली, तर अगदी सुरूवातीला प्रमोद इशाने याने वाघ बघितल्याची माहिती वनविभागाला दिली आहे. वाघ दिसल्याने काही शेतकरी व शेतमजुरांनी केलेली आरडाओरड शब्दापलीकडे ठरली. यात वाघाला घाबरून लगतच्या शेतातील झोपडीत स्वत:ला बंद करून घेणाऱ्या दोन महिलांपैकी एक महिला चक्क बेशुद्ध पडल्याचीही माहिती वनविभागाकडे आहे. शेतकऱ्यांनी वाघ बघितल्याच्या, त्यांना प्रत्यक्ष दिसल्याची माहिती असतानाही वनविभाग मानायला तयार नाही. वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून वाघ बघणाºयांची वनविभाग दिशाभूल करीत आहे. प्रत्यक्ष वाघ बघितल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब न करणाऱ्या वनविभागाने मात्र वाघाच्या पावलाच्या ठशांवर शिक्कामोर्तब केले आहे. वेगवेगळ्या शिवारात होत असलेली या वाघाची भटकंती आणि १५ दिवसांत त्याने केलेल्या तीन शिकारींमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. यातील काही शेतशिवारांना लागूनच अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर गावही आहे. केव्हाही गावात शिरून तो वाघ पाळीव प्राण्यांच्या शिकारीसह मनुष्यहानी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिंदी-काकडा - कुष्ठा रस्त्यावर वनाधिकाºयांनी गोळा केले केसं
मागील १७ दिवसांपासून आपले अस्तित्व प्रदर्शीत करीत असलेल्या, त्या वाघाचे वास्तव्य शिंदी गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावरील शिंदी - काकडा रस्त्यावरील कवीटकर यांच्या शेतात रविवार १७ नोव्हेंबरला गावकऱ्यांना आढळून आले. याची माहिती वनविभागाला गावकऱ्यांनी दिली. वनविभागाचे पथक दुपारनंतर त्या शेतशिवारात दाखल झाले. त्यांनी पाहणी करून तेथे आढळून आलेली केसं गोळा केलीत.
दरम्यान कुष्ठा रस्त्यावर तळोकार यांच्या शेतात वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आल्याची माहिती मिळताच, तेथूनच वनविभागाचे पथक तळोकार यांच्या शेतात दाखल झाले आहे. वनविभगाच्या पथकाने नितीन लहाणे, अशोक बोराळे, नंदू तळोकार, गजाणा वाठ, तुषार कवीटकर, सुखदेवराव फुलारी यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वाघाची शेतशिवारात भटकंती वाढली असताना एकामागून एक शिकार घडत असताना शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले असतानाही मागील १७ दिवसांत आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींनीदेखील याची दखल घेतलेली नाही. भेटी देऊन शेतकरी शेतमजुरांच्या भावना त्यांनी जाणून घेतलेल्या नाहीत. वनविभागासह राजस्व विभागाशी त्यांनी साधा संपर्कही साधलेला नाही. शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे निर्देशही दिलेले नाहीत.

लोकेशन नाही
वाघाचे अस्तित्व मान्य करणाऱ्या वनविभागाला त्या वाघाचे नेमके लोकेशन मागील १७ दिवसांत मिळालेले नाही. ट्रॅप कॅमेºयातही हा वाघ अडकलेला नाही.

शेतकरी संतप्त
वाघाची दहशत आणि वनविभागाचे वेळकाढू धोरण यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकरी, शेतमजुरांचा जीव घेतल्यानंतर वनविभाग याची दखल घेणार काय? शेतकऱ्याची शिकार या वाघाने करावी, याची वाट वनविभाग बघत आहे काय? अशा संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका घेवंदे यांच्या समवेत १७ नोव्हेंबरला परिसराची पाहणी केली. आढळून आलेली केसं गोळा केलीत. हे केसं वाघाची, डुकराची की पाळीव प्राण्यांची, हे आताच सांगता येणार नाही. पाहणीत कुठेही वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले नाहीत.
- दीपेश लोखंडे, वनपाल, परतवाडा वनपरिक्षेत्र

Web Title: The farmers did not see the tiger forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.