शेतकरी पुन्हा सावकारी पाशात
By Admin | Updated: November 15, 2015 00:11 IST2015-11-15T00:11:04+5:302015-11-15T00:11:04+5:30
दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली.

शेतकरी पुन्हा सावकारी पाशात
संस्कृती जपण्याचा परिणाम : कर्जाचा डोंगर कायम
सुमित हरकुट चांदूरबाजार
दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली.
जीवनात आनंद कसा उपभोगायचा याचे खरे शिक्षण शेतकऱ्यांकडून घेता येईल. जिवनाचे खरे सत्य त्यांनाच उलगडले आहे. कारण सर्वपरिस्थितीत संस्कार आणि प्रथा या गोष्टीची खऱ्या अर्थाने जतन करणारी मानवजात म्हणजे शेतकरी होय. सुख व शांतीचे प्रतीक म्हणून दिवाळी या सणाची ओळख आहे. या दिवशी आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठानाची, घराची सफासफाई करून रंगरंगोटी करतात. चिमुकल्यांसाठी नवनवीन कपडे खरेदी करतात. सर्वीकडे रोषणाईचा झगमगाट केला जातो, तर सणासुदीनिमित्त घरात फराळ व गोड पदार्थ बनविल्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु या परंपरा जपण्याकरिता अखेर पैसा लागतो. सतत तीन वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे जगाचा पोशिंदा सावकाराच्या दारातमदतीसाठी भटकत आहे.
दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतीतून उत्पादन खर्चसुद्धा निघालेला नाही. बँकेचे कर्ज काढून पेरलेले सोयाबीन पीक हातातून गेल्यामुळे दिवाळी साजरी करावी कशी, असा गहण प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव खासगी सावकारांच्या दारावर सण साजरा करण्याकरिता जाण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. संत्रा या पिकाचीसुद्धा हीच स्थिती निर्माण झाली असून संत्रा व्यापारी संत्रा बागेकडे फिरतसुद्धा नसल्यामुळे तालुक्यातील कित्येक संत्रा बागेत संत्रा तसाच पडून आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेल्या कापूस हे पीक दिवाळीनंतर येत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे. असे असले तरी आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकरिता बळीराजा सावकाराच्या दारी जाऊन पैशाची मागणी करीत असल्याचे चित्र आहे. सणासुदीत हा पोशिंदा पोटाला चिमटा घेऊन परिवाराच्या संसाराचा गाडा चालवित आहे. संस्कृतीचे जतन करीत आहे. मात्र प्रथा राबवीत असताना स्वत:च्या जीवनाचे वाटोळे करीत आहे. एकंदरीत शासनाकडून मिळणारे आश्वासनांपेक्षा शासनाकडून मिळणारी मदतच त्यास आवश्यक आहे. कारण पैशाचे काम अखेर पैसाच करतो, आश्वासन नाही.