शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा !
By Admin | Updated: August 8, 2015 00:26 IST2015-08-08T00:26:00+5:302015-08-08T00:26:00+5:30
तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा !
दिलासा : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत क्रांतिदिनी गृहप्रवेश
वरुड : तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता माणूस निघून गेलल्यावर तीन मुलीसह पत्नीचा संसार उघड्यावर आला होता. दोन वेळची पोटची खळगी भरण्यासाठी अन्न व डोक्यावर साधे छप्पर ही नव्हते. पतीच्या निधनानंजर ढोक परिवार बेघर झाला होता. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी घेऊन रमाबाईला हक्काचे घर उभारुन दिले. तसेच मुलींचा शिक्षणाचा भार उचलला. यामुळे क्रांतीदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे ढोक परिवाराला घर हस्तांतरित करणार आहे.
खानापूर येथील शिवहरी ढोक या शेतकऱ्याकडे पावणेतीन एकर कोरडवाहू जमीन होती. कपाशी, तूर पेरली. मात्र निसर्गाच्या अवकृपेने संपुर्ण पीक बुडाले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढला.
परिवारातील तीन मुलींचे शिक्षण कसे करावे? कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न निर्माण झाला. यातच घरबांधणीकरिता एका कंपनीचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीकरिता सततचा तगादा सुरु झाल्याने ते निराशेच्या गर्तेत आले होते. अखेर शेतात विष प्राशन करून ५ एप्रिलला त्यांनी जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने डिंपल, श्वेता संवदा या तीन मुलीसह पत्नी रमाबाई व्यथित झाली होती. ग्रामस्थांनी मदत करुन दुसऱ्याच ेघरात आश्रय दिला.
शेतकरी आत्महत्या ग्रस्त ढोक परिवारावर दु:खाचे सावट होते. सरकारने काही प्रमाणात धान्य देऊन बोळवण केल्यागत प्रकार घडला होता. लोकप्रतिनीधींनी अल्पशी मदत केली होती. परंतु निवारा नसल्याने या परिराची कुचंबणा होती. एक महिण्यापूर्वी खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर वरुडला आले असता ढोक परिवाराची व्यथा ऐकून नि:शब्द झाले होते. थेट खानापूर गाठून ढोक परिवाराची डोळे पाणावणारी दु:खद कहाणी ऐकली तेव्हा तिन्ही तरुण मुलींनी केवळ आम्हाला स्नानगृह आणि शौचालय बांधून द्या अशी विनवणी केली. तेव्हा खा. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या वर्गणी आणि श्रमदानातून सर्वसोयीचा निवारा उभारुन रमाबाई आणि तीन मुलींना कायमचा निवारा बांधून दिले. (तालुका प्रतिनिधी)