शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 18, 2014 00:50 IST2014-10-18T00:50:53+5:302014-10-18T00:50:53+5:30
बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिपदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़ परंतु ....

शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात
धामणगाव रेल्वे : बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिपदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील १३ हजार शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात जाणार आहे़ पूर्व भागात केवळ एकरी एक पोते सोयाबीन घरी आल्याने गतवर्षी सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले कर्ज परत करण्याची व्यवस्था शेतकऱ्याकडे नसल्यामुळे सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़
जिल्ह्यात सर्वाधिक फटका खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ तालुक्यातील पूर्व भागातील सोयाबीन पीक पूर्णत: यावेळी वाया गेले आहे़ परिसरातील बोरगाव निस्ताने, दिघी महल्ले, नायगाव, गोकुळसरा, सोनेगाव खर्डा, झाडा, चिंचोली, आष्टा या नदीकाठच्या गावांच्या भागातील शेतकरी दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीनचे उत्पादन घेत असत. यंदा तर शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे़ हार्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर १ एकरात केवळ एक पोत सोयाबीन निघाले. त्यामुळे हार्वेस्टरचा खर्च देणे परवडनासे झाले असल्याची माहिती दिघी येथील शेतकरी अरूण महल्ले यांनी दिली़ एकरासाठी तब्बल १५ ते २० हजार रुपये खर्च सोयाबीनसाठी आला असताना एक किंवा दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर मागील वर्षाचे सावकरांचे कर्ज द्यावे, की बँकेची परतफेड करावी किंवा दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न महल्ले यांनी उपस्थित केला आहे.