मोर्शी : शेतालगत असलेल्या पांदण रस्त्यावर पाणी सोडल्याबाबत हटकणाऱ्या शेतकऱ्याच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन चामडे सोलल्याची घटना नजीकच्या दापोरी शिवारात घडली. पोलीस सूत्रांनुसार, दापोरी येथील शेतकरी विजय माणिकराव विघे (५२) यांची आठ एकर शेती दापोरी शिवारात असून, त्यांच्या शेतात संत्र्याची झाडे आहे. त्यांच्या शेताला लागूनच विश्वास गणेश वानखडे (५५, रा. दापोरी) यांचे शेत आहे. शेताला लागून पांदण रस्ता आहे. या रस्त्याने लोक ये-जा करीत असतात. विश्वास वानखडे हा शेताचे कुंपण बाहेरून भरत असून, रस्त्यावर पाणी सोडतो. याबाबत विजय विघे यांनी त्यांना बरेच वेळा समजाविले. दरम्यान नेहमीप्रमाणे विघे हे आपल्या शेतात गेले असता वानखडे यांनी रस्त्यातच पाणी सोडल्यामुळे पुढील शेतात जाणारे लोक विघे यांच्या शेतातून जाणे-येणे करीत होते. म्हणून त्यांनी विश्वास वानखडेला रस्त्यात पाणी का सोडले असे विचारले असता त्यांनी वाद घालून विघे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी पायाच्या घुटन्याला मारहाण करून खाली पाडले. व त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला चावा घेऊन बोटाचे चामडे अलग केले. व पत्नीच्या हाताने तुला मारून फसवितो अशी धमकी सुद्धा दिली. घटनेची फिर्याद मोर्शी पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार डीहीये यांनी आरोपी विश्वास वानखडे त्याचे विरुद्ध कलम 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
दापोरी शिवारात शेतकऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST