सार्वजनिक वापराच्या भूखंडांची महापालिकेच्या नावे फेरनोंद
By Admin | Updated: July 25, 2016 00:16 IST2016-07-25T00:16:03+5:302016-07-25T00:16:03+5:30
साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्ट विश्वस्तांनी संस्थानच्या सावर्जनिक भूखंडांचा व्यावसायिक वापर सुरू केला होता.

सार्वजनिक वापराच्या भूखंडांची महापालिकेच्या नावे फेरनोंद
नागरिकांना दिलासा : माजी व्यवस्थापक अविनाश ढगेंच्या लढाईला यश
अमरावती : साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्ट विश्वस्तांनी संस्थानच्या सावर्जनिक भूखंडांचा व्यावसायिक वापर सुरू केला होता. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी चार भूखंडांचा फेरफार रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार साईबाबा ट्रस्टच्या नावे असलेल्या भूखंडांचा फेरफार रद्द करून तो फेरफार आता महापालिकेच्या नावे करण्यात आलेला आहे.
श्री साईबाबा ट्रस्टने सार्वजनिक वापराचे ८७, १२१, १२२ व १२४ या क्रमाकांच्या भूखंडाचा वाणिज्य वापर करीत आहे, विश्वस्तांनी चुकीचे फेरफार करून ट्रस्टच्या नावे नोंद केल्याची तक्रार माजी व्यवस्थापक अविनाश ढगे व स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारीवरून नगररचना विभागाने फेरफार रद्द करून महापालिकेच्या नावे करण्यासंदर्भात एसडीओंकडे दाद मागितली होती. यासंदर्भात ढगे यांनी सबळ पुरावे सादर केल्याने तो फेरफार रद्द करून महापालिकेच्या नावे नोंद करावी, असा निर्णय उपविभागीय अधिकारी यांनी दिला होता. त्यानुसार साईबाबा ट्रस्टच्या नावे असणाऱ्या चारही भुखंडाची नोंद रद्द करून महापालिकेच्या नावे नोंद करण्यात आलेली आहे. मात्र, ट्रस्टचे विश्वस्त भूखंडावर महापालिकेने ताबा घेऊ नये, या प्रयत्नात असल्याचा आरोप ढगेंचा आहे. (प्रतिनिधी)
श्री साईबाबा ट्रस्टच्या नावाचे भूखंडांची फेरफार नोंद रद्द करून महापालिकेच्या नावे करण्यात यावी, असा निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील अंमलबजावणी तहसील स्तरावर केली जाईल.
- प्रवीण ठाकरे,
उपविभागीय अधिकारी
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने श्री साईबाबा ट्रस्टच्या भूखंडाचा फेरफार रद्द करून त्याच्या नोंदी महापालिकेच्या नावे करण्यात आलेली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत फेरफार नोंदी झाल्या आहेत.
- सुरेश बगळे,
तहसीलदार, अमरावती