एफबीवरील ‘फाॅर अ न्यू जर्नी’ पोस्ट ठरली अखेरची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:29+5:302021-09-09T04:17:29+5:30
फोटो पी ०८ झामरकर अमरावती : ‘वे टू मुंबई फ्रॉम अमरावती, मुंबई काॅल्ड अगेन, आय वेन्ट ऑन अगेन, फॉर ...

एफबीवरील ‘फाॅर अ न्यू जर्नी’ पोस्ट ठरली अखेरची!
फोटो पी ०८ झामरकर
अमरावती : ‘वे टू मुंबई फ्रॉम अमरावती, मुंबई काॅल्ड अगेन, आय वेन्ट ऑन अगेन, फॉर अ न्यू जर्नी, न्यू लिंक्स टू बी ॲडेड’ विनायक झामरकर यांची ही फेसबूकवरील पोस्ट. त्यांच्या अपघाती मृत्यूने ती अखेरची पोस्ट ठरली. मुंबई जातेवेळी त्यांनी स्वत:चे छायाचित्र टाकून सोमवारी सायंकाळी ही पोस्ट एफबीवर अपलोड केली. मंगळवारी रात्री मुंबईहून परतताना सीएसटीसमोरच्या स्थानकालगत त्यांचा रेल्वेप्रवासादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या एफबी पोस्टमध्ये नव्या प्रवासाला चाललोय, असा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूची चाहूल तर लागली नव्हती ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
विनायक एम. झामरकर यांचा मुंबईत रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची माहिती बुधवारी सकाळी १० च्या सुमारास अमरावती महापालिकेत पोहोचली. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिक असलेले झामरकर हे आयुक्त व कार्यकारी अभियंत्यांसमवेत ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अंबा एक्स्प्रेसने मुंबई गेले होते. मंगळवारी झामरकर हे अनुसूचित जाती कल्याण समितीच्या साक्षीसंदर्भात मंत्रालयात उपस्थित होते. ते मंगळवारी रात्री ८ वाजता मुंबईच्या सीएसटी स्थानकावरून अमरावतीच्या परतीच्या प्रवासासाठी निघाले. चव्हाण हे त्यावेळी दुसऱ्या बोगीत होते. पहाटे ४ च्या सुमारास झामरकर हे जखमी स्थितीत मशीद बंदर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मलगत आढळून आले. त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, खिशातील ओळखपत्रामुळे विनायक झामरकर यांची ओळख पटली. सीएसटी रेल्वे पोलीस व जे.जे. रुग्णालयाकडून अमरावती महापालिकेला त्याबाबत माहिती देण्यात आली. धावत्या रेल्वेतून पडल्याने मोठा रक्तस्राव झाला. पाऊस सुरू असल्याने ते पडल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
/////////
कुटुंब, सहकारी मुंबईला रवाना
चिखलदरा तालुक्यातील सलोना या गावचे मूळ रहिवासी असलेले विनायक झामरकर हे २००४ पासून महापालिकेत कार्यरत होते. त्यांच्या पत्नी वनविभागात कर्मचारी आहेत. दोन लहानग्या मुलींचे पिता असलेले झामरकर यांचे पार्थिव आणण्यासाठी त्यांची पत्नी, महापालिकेतील सहकारी पंकज आकोडे व फायरमन संतोष केंद्रे हे बुधवारी सकाळी मुंबई रवाना झाले आहेत.
////////
अपघात रात्रीचाच?
सीएसटी ते मशीद बंदर या रेल्वे स्थानकादरम्यानचे अंतर केवळ दोन किलोमीटर आहे. ते जखमी अवस्थेत मशीद बंदर भागात आढळून आले. त्यामुळे ते मंगळवारी रात्री ८ ते ८.१५ च्या सुमारास पडले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. जे.जे.मधील पोस्टमार्टमनंतर मृत्यूचे नेमके कारण व वेळ स्पष्ट होईल.