विद्यार्थ्यांच्या नावे खोटे दाखले
By Admin | Updated: August 25, 2014 23:42 IST2014-08-25T23:42:56+5:302014-08-25T23:42:56+5:30
जिल्हाधिकारी कार्यलयाने माध्यमिक शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपविली होती. राठोड यांनी २५ डिसेंबर २०१३ रोजी उपशिक्षणाधिकारी मिलिंद वसंतराव राजगुरे

विद्यार्थ्यांच्या नावे खोटे दाखले
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यलयाने माध्यमिक शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपविली होती. राठोड यांनी २५ डिसेंबर २०१३ रोजी उपशिक्षणाधिकारी मिलिंद वसंतराव राजगुरे यांच्याकडे चौकशीसाठी हे प्रकरण हस्तांतरित केले. चौकशीदरम्यान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय उत्तमराव अडसोड यांच्यासह इतर अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी विकास विद्यालयातील वर्गतुकड्या टिकविण्यासाठी संगनमताने बनावट (डमी) विद्यार्थांच्या नावाचे खोटे दाखले तयार केले. या दाखल्याच्या आधारावर त्यांनी विद्यार्थांची खोटी पटसंख्या हजेरीपटावर दाखविली. हे बनावट काम करण्याकरीता त्यांनी मोर्शी तालुक्यातील डोमक येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत तत्कालिन मुख्याध्यापक एल.एस. पांडे यांची मदत घेतली.
धारणी तालुक्यातील बारतांडा येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेच्या नावाचा वापर करून विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे खोटे दाखले तयार केले. याच दाखल्यांच्या आधारावर विकास विद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेशही दाखविले. मुख्याध्यापकांसह इतर कर्मचाऱ्यांनी हजेरीपटावर खोटी (डमी) पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी २४ फ्रेब्रुवारी २०१४ रोजी शिक्षणाधिकारी राठोड यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी राठोड यांनी शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश राजगुरे यांना दिले. त्यानुसार राजगुरे यांनी १३ मार्च २०१४ रोजी २६४ पानांची सर्व पुऱ्याव्यांनिशी लेखी तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. हे प्रकरण पोलीसांनी चौकशीत ठेवले. परंतु या तक्रारीचे काय झाले? याची कुठलीही माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना कळविली नाही किंवा कोणतीच कारवाई देखील केली नाही. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर ‘लोकमत’शी बोलताना संंशय व्यक्त केला.
शेंडेंनी घेतली तक्रार मागे
रामराव शेंडे यांनी लोकशाही दिनी विकास विद्यालयातील घोट्याळ्यांसंदर्भात तक्रार केली होती. चौकशीदरम्यान या शाळेतील घोटाळा उघडकीस आला. परंतु त्यानंतर शेंडे यांनी लोकशाहीदिनी दिलेली तक्रार मागे घेतली. त्यामुळे शेंडे यांचे समाधान झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. परंतु शासनाची दिशाभूूल थांबविण्यासाठी शिक्षणाधिकारी राठोड यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश उपशिक्षणाधिकारी राजगुरे यांना दिले.
वसतिगृहातही बोगस प्रवेश
विकास विद्यालय या शाळेअंतर्गत समाजकल्याण विभागाद्वारे संचालित महात्मा फुले वसतिगृह आहे. या वसतिगृहातही विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेश दाखविण्यात आले आहेत.