खोट्या तक्रारी केल्यास फौजदारी

By Admin | Updated: July 9, 2015 00:09 IST2015-07-09T00:09:53+5:302015-07-09T00:09:53+5:30

नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे.

False complaints lead to criminalization | खोट्या तक्रारी केल्यास फौजदारी

खोट्या तक्रारी केल्यास फौजदारी

महापालिका आयुक्तांचा निर्णय : मालमत्ता कर, पाणीपट्टी, घराचा मंजूर नकाशा अनिवार्य
अमरावती : नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु काही लोक खोट्या तक्रारी देऊन प्रशासनाची दिशाभूल करतात. मात्र, आता तक्रार खोटी निघाल्यास संबंधित तक्रारकर्त्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. इतकेच नव्हे तर तक्रारीसाठी स्वतंत्र छापील अर्ज नमुना तयार करण्यात आला आहे.
चंद्रकांत गुडेवार यांनी १४ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागरिकांकडून समस्या, गाऱ्हाणी, तक्रारींचा ओघ वाढला आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु प्राप्त तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी द्वेषभावनेतून अथवा वैमनस्यातून दिल्या जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी समस्याग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तक्रारीची सत्यता पडताळण्याकरिता सविस्तर माहितीचा अर्ज भरुन घेण्याचे ठरविले आहे. या अर्जानुसार तक्रार घेतली जाणार आहे. तक्रार निराधार निघाल्यास संबंधित तक्रारकर्त्यावर फौजदारी कारवाई करण्याचे नवे धोरण आहे. आतापर्यंत कोणीही आयुक्तांच्या दालनात थेट प्रवेश करून अतिक्रमण, अवैध बांधकाम, कर, मूल्यांकन आदी समस्या मांडीत होते. परंतु योतील बहुतांश तक्रारी हेतुपुरस्सर केलेल्या असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. खोट्या व वैमनस्यातून दिलेल्या तक्रारींची चौकशी करताना प्रशासनाचा वेळ, अधिकाऱ्यांचे श्रम वाया जात होते.
मात्र तक्रारीच्या नवीन पॅटर्नमुळे कोणी तक्रार दिली, संपर्क क्रमांक या अर्जातच नमूद राहात असल्यामुळे ही तक्रार खोटी निघाल्यास तक्रारकर्त्यावर कारवाई करणे प्रशासनाला सुकर होईल. आयुक्तांच्या या नव्या धोरणामुळे खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल, असे चित्र आहे.

तक्रारीपूर्वी या बाबी
पूर्ण करणे अनिवार्य
महापालिकेत नागरिकांना समस्या, प्रश्न, मूलभूत सोयीसुविधांविषयी तक्रार करायची झाल्यास आता मालमत्ता कर, पाणीपट्टी कराचा भरणा केलेला असावा. घराचा मंजूर नकाशा आवश्यक असेल. तक्रारकर्त्यांना संपर्काचा पत्तादेखील अर्जासोबत द्यावा लागणार आहे.

तक्रारींचा ओघ वाढला असून यात काही जण खोट्या तक्रारी देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती तपासली जाईल. ही तक्रार खोटी निघाल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करु.
- चंद्रकांत गुडेवार
आयुक्त, महापालिका.

Web Title: False complaints lead to criminalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.