बनावट मतदार नोंदणीचा भंडाफोेड
By Admin | Updated: October 30, 2016 00:09 IST2016-10-30T00:09:21+5:302016-10-30T00:09:21+5:30
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र व वयाचे दाखले लावून .....

बनावट मतदार नोंदणीचा भंडाफोेड
२४० अर्ज रद्द : तहसील कार्यालयात प्रकार उघडकीस
अमरावती : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र व वयाचे दाखले लावून अर्ज दिल्याचा गंभीर प्रकार शनिवारी तहसील कार्यालयात उघड झाला. हा बनावटपणा उघड झाल्यानंतर अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी २४० जणांचे अर्ज रद्द केले आहेत. दरम्यान दोषींवर फौैजदारी कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राबविल्या जाणाऱ्या मतदार नोंदणी प्रक्रियेत घोळ झाल्याचे प्रकार अनेकदा उघड झाले आहेत. मात्र, नोंदणी अर्जाला अल्पवयीनांचे बनावट दस्तऐवज लावून अर्ज सादर करण्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी उघड झाला. मार्च २०१७ मध्ये अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने १६ सप्टेंबरपासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे. १ जानेवारी २०१७ ला वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे या मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. अमरावती तहसील कार्यालयासह महापालिका झोन कार्यालयात ही नोंदणी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार धीरज मांजरे, नीता लबडे व अरविंद माळवे मतदार अर्जांची पडताळणी करीत होते. दरम्यान त्यांना ७२८ अर्जांमध्ये विविध प्रकारच्या त्रुट्या आढळून आल्यात. त्यापैकी १४० अर्जाला जोडण्यात आलेले बोनाफाईड प्रमाणपत्र व १०० अर्जांसोबत लावण्यात आलेले वयाचे दाखले बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या अर्जांची वारंवार पडताळणी केली असता २४० जणांच्या अर्जाशी संलग्न असलेला दस्तऐवज असोसिएशन उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य फिरोज खान यांच्या स्वाक्षरी व मुद्रेनिशी असल्याचे निदर्शनास आले. हा बनावट प्रकार पाहून त्यांनी तत्काळ तहसीलदार सुरेश बगळे यांना माहिती दिली. त्यांनी या प्रकाराची शहानिशा केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. नायब तहसीलदार मांजरे, माळवे, तलाठी मनोज धर्माळे, अजय पाढेकर व मंडळ अधिकारी संजय ढोक हे लागलीच उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये पोहोचले व तेथून संबंधित दस्तऐवज जप्त केला. या गंभीर प्रकाराची माहिती बगळे यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दोषींवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले. बगळे यांनी ते २४० अर्ज रद्द केले असून त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे नोटीस बजावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
२४० जणांचे बयान 'रेकॉर्ड' करणार
मतदार नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या २४० जणांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे बयान रेकॉर्ड केले जाणार आहे. या बनावट मतदारांचे बोनोफाईड प्रमाणपत्र व वयाचे दाखल्यामध्ये तफावत व खोडतोड आढळून आली आहे. आगामी महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने अधिक मतदारांना सामावून घेण्याची कसरत इच्छुकांनी चालविली आहे. त्यामुळे पठाण चौक व लगतच्या परिसरामधील असलेले हे मतदार अर्ज नेमके कोणत्या इच्छुकांकडून भरण्यात आले. त्यांचीही चौकशी केली जाईल.
बीएलओंची चौकशी होणार
मतदार नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी संबंधित मतदाराला बीएलओंमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यामार्फत ते अर्ज तहसील कार्यालयाकडे येतात. त्यामुळे या बनावट दस्तऐवजांकडे बीएलओंनी का लक्ष दिले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बीएलओचीसुध्दा चौकशी केली जाणार आहे.
मतदार नोंदणीच्या अर्जात देण्यात आलेले बोनोफाईट प्रमाणपत्र व वयाचे दाखले माझ्या महाविद्यालयातील नाहीत. आमच्या महाविद्यालयाच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करून ते अर्जाला लावले असावेत. अर्ज कोणी व का सादर केलेत, याबाबत मी अनभिन्न आहे.
फिरोज खान, प्राचार्य, असोसिएशन उर्दू ज्युनिअर कॉलेज, पठाण चौक.
मतदार नोंदणीसाठी आलेल्या २४० अर्जांतील बोनोफाईड प्रमाणपत्र व वयाचे दाखले बनावट असल्याचे निदर्शनास आहे. ते अर्ज रद्द करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संबधीतांवर फौजदारी कारवाई केली जाईल.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती .