बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By Admin | Updated: June 18, 2014 23:52 IST2014-06-18T23:52:42+5:302014-06-18T23:52:42+5:30
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा मोहक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो पोलिसांना दोन महिन्यांपासून हुलकावणी देत होता. सोमवारीही तो पोलिसांच्या हातावर

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
दर्यापूर/लेहेगाव रेल्वे : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा मोहक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तो पोलिसांना दोन महिन्यांपासून हुलकावणी देत होता. सोमवारीही तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडिका कार सोडून पसार झाला होता.
अमरावतीच्या हैदरपुरा येथील शेख वसीम शेख मकसूद ऊर्फ वसीम चायना याला बुधवारी दुपारी १२ वाजता दर्यापूर येथील शिवाजी चौकातून दर्यापूर पोलिसांनी अटक केली. यापूर्वी पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सदस्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. वसीम चायना १७ मे पासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दर्यापूर येथील श्रीकृष्ण रायबोले याच्या घराची झडती घेऊन त्याला अटक केली होती. त्याच्या घरातून २ लाख ९ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर तोंगलाबाद येथील रहिवासी व कारंजा लाड येथे डाक विभागात कार्यरत सचिन शंकरपुरे याला अटक करुन त्याच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
त्यानंतर १७ मे रोजी सायंकाळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावतीच्या पंचवटी चौकात सापळा रचला; मात्र टोळीचा प्रमुख वसीम चायना दुचाकी वाहनाने पसार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी गाडगेनगर पोलिसांनी वलगाव मार्गावरील एका हॉटेलसमोरुन वसीमची दुचाकी ताब्यात घेतली होते. ही दुचाकी दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली.हे प्रकरण दर्यापूर न्यायालयात सुरु असल्याने पसार वसीम हा मंगळवारी दर्यापूर न्यायालयात जामीन मिळण्यासाठी हजर होणार असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला प्राप्त झाली.