उलटचोच तुतारी पक्ष्याची जिल्ह्यात प्रथमच नोंद
By Admin | Updated: May 4, 2016 00:19 IST2016-05-04T00:19:08+5:302016-05-04T00:19:08+5:30
परतीच्या प्रवासात असणाऱ्या उलटचोच तुतारी या दुर्मिळ पक्ष्याची जिल्ह्यातील सावंगा तलावावर प्रथम नोंद झाली आहे.

उलटचोच तुतारी पक्ष्याची जिल्ह्यात प्रथमच नोंद
अमरावती : परतीच्या प्रवासात असणाऱ्या उलटचोच तुतारी या दुर्मिळ पक्ष्याची जिल्ह्यातील सावंगा तलावावर प्रथम नोंद झाली आहे. या पक्ष्याची विदर्भातील पक्ष्यांच्या सूचित फार पूर्वी नोंद झाली. मात्र हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांनी दिली.
हिवाळ्यात हजारो किमीचा प्रवास करून विविध प्रजातीचे पक्षी देश-विदेशातून जिल्ह्यातील तलावांवर येतात. हिवाळा संपल्यानंतर हे पक्षी परतीच्या प्रवासाला लागतात. मार्चमध्ये आपल्या भागातील पक्षी परत गेल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात दक्षिण भारतातून स्थलांतर करून जाणारे पक्षी परतीच्या प्रवासाला लागतात. दरम्यान, ते पक्षी काही दिवस किंवा थोडा काळासाठी तरी मुक्काम करतात. त्यावेळी पक्षी निरीक्षकांना या स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्याची संधी मिळते. वाईल्ड लाईफ अॅन्ड एन्व्हॉयर्न्मेंट कन्झर्व्हेशन सोसायटीचे पक्षी अभ्यासक आशिष चौधरी व मनोहर खोडे वरुडनजीकच्या सावंगा तलावावर पक्षी निरीक्षण करीत असताना त्यांना उलटचोच तुतारी पक्षी आढळून आला. हा पक्षी आकाराने सामान्य तुतारी पक्ष्यापेक्षा पाच सेंटीमीटरने मोठा असून यांची चोच काळ्या रंगाची, जाड, लांब व वरच्या दिशेने वळलेली असते. पायाचा रंग पिवळा असून पाय लांब असतात, तसेच शरीराचा रंग राखडीसारखा असतो. खांद्यावर काळपट रंग व छातीचा भाग पांढरा असतो. या पक्षाचे शास्त्रीय नाव झेनुस सिनेरिअस असे असून मराठीतील ओळक उलटचोच तुतारी अशी आहे. महाराष्ट्रामध्ये हा पक्षी समुद्रकिनाऱ्यावर नियमीतपणे आढळून येतो. मात्र, विदर्भात तो केवळ परतीच्या प्रवासात दिसून येतो. वेक्सचे सचिव जयंत वडतकर, निनाद अभंग, किरण मोरे, शिशिर शेंडोकार, गजानन वाघ, गजानन बापट, सौरभ जवंजाळ, मनीष ढाकुलकर यांचा पक्षी निरीक्षणात सहभाग आहे.