महिला पोलिसांना शासन पुरविणार सुविधा
By Admin | Updated: January 5, 2015 22:56 IST2015-01-05T22:56:46+5:302015-01-05T22:56:46+5:30
पोलीस दलात दिवसेंदिवस महिलांचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात ते आणखी वाढणार असल्याने महिला पोलिसांच्या अडचणी, गैरसोयी दूर करुन त्यांना सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील

महिला पोलिसांना शासन पुरविणार सुविधा
अमरावती : पोलीस दलात दिवसेंदिवस महिलांचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात ते आणखी वाढणार असल्याने महिला पोलिसांच्या अडचणी, गैरसोयी दूर करुन त्यांना सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी केले. पोलीस संकुल अमरावती ग्रामीण परिसरात पोलीस कल्याण विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाळणाघराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलिसांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज उद्घाटन झालेले पाळणाघर हा या सुविधांचाच भाग असल्याचे उघडे यांनी सांगितले. सुविधा वाढल्या की जबाबदारीही वाढते. त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी करुन पोलीसांनी शासन व सामान्य जनतेला असलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असेही उघडे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू,अपर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंघे उपस्थित होते.
पाळणाघराची निर्मिती करीत असताना येथे चिमुकल्यांचे मन रमावे या हेतूने भिंतींवर श्री शिवाजी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. त्या विद्यार्थ्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाळणाघराची अंतर्गत सजावट उत्तम झाली असून या पाळणाघरात बालके नक्की रमतील असा विश्वास पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी व्यक्त केला. तसेच पाळणाघराच्या उभारणीसाठी प्रयत्न केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
प्रास्ताविक पोलीस निरीक्षक व्ही.आर. आढाव यांनी केले. आभारप्रदर्शन पोलीस उपअधीक्षक (गृह) डी.एफ.कदम यांनी केले. यावेळी पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक रफिक शेख, पोलीस निरीक्षक नीलिमा आरज तसेच अमरावती ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. महिला पोलिसांच्या सोयीच्या दृष्टीने एकेक पाऊल उचलण्याचा निर्र्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.