अतिदुर्गम हतरू संपर्कविहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:48+5:302020-12-26T04:10:48+5:30
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम हतरू हे व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वसलेले व शेवटच्या टोकाला वसलेले गाव. परतवाड्यापासून हतरूचे ...

अतिदुर्गम हतरू संपर्कविहीन
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम हतरू हे व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वसलेले व शेवटच्या टोकाला वसलेले गाव. परतवाड्यापासून हतरूचे अंतर तब्बल ९८ किलोमीटर असून, या गावाला ये-जा करण्यासाठी एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. सबब, परिसरातील नागरिकांनी परतवाडा येथील आगरप्रमुखांना निवेदन देऊन बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या पर्वापासूनपरतवाडा हतरू ही बससेवा बंद असल्याने हतरूसारख्या दुर्गम भागाचा नागरी व शहरी जनजीवनाशी संपर्क तुटला आहे. हतरू या अतिदुर्गम ठिकाणची सर्वात मोठी बाजारपेठ परतवाडा असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, दवाखाने, शिक्षण, शेती, आरोग्य व सर्व बाबतीत परिसरातील नागरिक परतवाडा येथे नियमित ये-जा करीत असतात. म्हणून ही बसफेरी नियमितपणे सुरू असणे आवश्यक आहे. बसफेरी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करणे कठीण झाले आहे. रुग्णांना दवाखान्यात नेणे, तथा शासकीय प्रशासकीय कामकाज करणे सहज शक्य होत नसल्याने कामे खोळंबली आहे. हतरू हा परिसर आदिवासीबहुल असून आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने खासगी वाहने भाड्याने करून गरजांची पूर्तता करणे शक्य नाही. बिबा, राहु, कारंजखेडा, बारुगव्हाण, कामिदा, जारिदा, चुरणी, काटकुंभ, डोमा, दहेंद्री, कोटमी, गांगरखेडा, पलस्या, हतरू, चिलाटी, सिमोरी, रुईपठार, सरवारखेडा, मारिता, डोमी, कुही व भुत्रुम या गावांतील नागरिकांनी परतवाडा हतरू बससेवा पुर्ववत करण्याची मागणी केली आहे.
-------------------