चोरट्या मार्गाने रेतीची सर्रास वाहतूक
By Admin | Updated: January 31, 2016 00:21 IST2016-01-31T00:21:52+5:302016-01-31T00:21:52+5:30
मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर राज्य परिवहन विभागाचा वाहन तपासणी नाका आहे.

चोरट्या मार्गाने रेतीची सर्रास वाहतूक
तहसीलदारांची धास्ती : कन्हान रेतीची चोरी, माफियांची नवी शक्कल
वरुड : मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर राज्य परिवहन विभागाचा वाहन तपासणी नाका आहे. परंतु रेतीमाफियांकडून तपासणी नाका चुकवून तहसीलदारांच्या कारवाईमुळे क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहने चोरट्या मार्गाने नेली जातात. गत पाच महिन्यांपासून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी कारवाईचा दणका सुरू केला. रेती तस्करांनी शक्कल लढवून आता पहाटेच्या वेळी आणि सुटीच्या दिवशी दोन ब्रासच्या रॉयल्टी पासेसवर चार ते पाच ब्रास रेतीची वाहतूक सुरु केली आहे.
दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल देणारे वरुडचे परिवहन विभागाचा तपासणी नाका येथे आहे. मध्यप्रदेशातून पांढुर्णामार्गे क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक होत असताना डोळेझाकपणा होत होता. तालुक्यातील रेतीघाटाचा लिलावसुध्दा झाला नसल्याने रेतीची चोरी होती. परंतु उशिरा देऊतवाडा, घोराड घाटाचा लिलाव झाला. यामुळे तालुक्यातील काहीसा प्रश्न सुटला असला तरी उर्वरित घाटावरून मात्र रात्रीतून रेती चोरी सुरूच आहे. तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी कारवाईचा बडगा उगारून लाखो रुपयांचा दंड चोरीच्या गौण खनिज वाहतुकीत शासन जमा केला. यामुळे रेती चोरट्यांना सळो की पळो करून सोडले. तहसीलदारांच्या धसक्याने रेतीमाफियांनी आता पहाटेच्या वेळी रेती वाहतूक सुरू केली आहे. परंतु यावर अंकुश ठेवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जडवाहने आडमार्गाने ग्रामीण भागातून जातात. काही खासगी दलालसुद्धा या व्यवसायात सक्रिय आहे. काही संबंधित अधिकाऱ्यांसोबत सूत जमवून ‘अॅडजेस्टमेंट’करिता सक्रिय असतात. राजाश्रय आणि अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळे आलेल्या अधिकाऱ्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अवस्था आहे. येथून रेतीची दहाचाकी ट्रक सुसाट बेसुमारपणे जातात. परंंतु त्यांच्या विरोधात कुणीही ‘ब्र’सुध्दा काढत नाही. रेतीमाफियांचे वरिष्ठ पातळीवर हितसंबंध असल्याने ट्रक थांबवताच दूरध्वनी खणखणणे सुरू होते. १० चाकी ट्रक ३५ ते ४० टन रेतीची वाहतुूक करीत असल्याने ग्रामीण रस्त्याची दुर्दशा झाली आहे.