‘सिटी लँन्ड’ धाडसत्रप्रकरणी कमालीची गुप्तता
By Admin | Updated: October 17, 2015 00:23 IST2015-10-17T00:23:13+5:302015-10-17T00:23:13+5:30
नागपूर महामार्गालगतच्या सिटी लँड व्यापारी संकुलात येथील प्राप्तिकर विभागाने १५ दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडसत्रप्रकरणी कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

‘सिटी लँन्ड’ धाडसत्रप्रकरणी कमालीची गुप्तता
प्राप्तिकर विभाग : आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचा अंदाज
अमरावती : नागपूर महामार्गालगतच्या सिटी लँड व्यापारी संकुलात येथील प्राप्तिकर विभागाने १५ दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडसत्रप्रकरणी कमालीची गुप्तता पाळली जात आहे. नेमकी कोणत्या स्वरुपाची कारवाई करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र प्राप्तीकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नागरिकांची संपत्त व उत्पन्नावर सूक्ष्म नजर ठेवून असलेला प्राप्तिकर विभाग व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योजक, संकुल, धनदांडग्यांच्या निवासस्थानी धाडी टाकून संपत्तीची चौकशी करतात, हा या विभागाच्या कार्यशैलीचा शिरस्ता आहे. परंतु धाडसत्रानंतर कोणती कारवाई केली हे कदापिही कळू शकले नाही. याच श्रुंखलेत नागपूर महामार्र्गावर १५ दिवसांपूर्वी ‘सिटी लँड’मधील व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडसत्र राबविले. तब्बल चार दिवसापर्यंत प्राप्तिकर विभागााने ही कारवाई केली होती. अनेक व्यवसायिकांचे खाते ताब्यात घेवून विवरणपत्र तपासण्याची मोहीम राबविली होती. कोट्यवधी रुपयांच्या देयकांत गडबड असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. ३० ते ३५ खाते तपासल्यानंतर नेमकी कोणती कारवाई झाली, हे कळू शकले नाही. सिटी लँडवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडसत्राचे बिंग फुटू नये, यासाठी राजकीय आश्रय घेतल्याची माहिती आहे. एका आमदाराने हे प्रकरण शांत करण्यासाठी पुकाढार घेतला असून सिटी लँडवरील कारवाईला प्राप्तीकर विभागाने सौम्य स्वरुप द्यावे, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत प्राप्तीकर विभागाने मोठ्या स्वरुपाची कारवाई केली असली तरी या कारवाईला वेगळे वळण देण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. या कारवाईसंदर्भात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी अभय नन्नावरे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, हे विशेष.