विद्यापीठात बिबट्यांसाठी अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:56+5:30
बिबट्यांमुळे विद्यापीठात मोकाट कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली, हे नक्की. विद्यापीठाच्या मागील भागातील जंगलातून ये-जा करणाऱ्या बिबट्यांच्या जोडप्यांनी काही भाग संचारासाठी निश्चित केले आहे. घनटाद वृक्ष, झाडा-झुडपात ते दडून बसल्याचे सुरक्षा रक्षकांनी अनेकदा बघितले आहे.

विद्यापीठात बिबट्यांसाठी अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात गत दोन वर्षांपासून बिबट्याच्या जोडप्यासह दोन पिलं वावरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविण्याच्या निर्णय वनविभागाने घेतला आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती आहे.
विद्यापीठात सावज शोधण्यासाठी बिबट येत असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. बिबट्यांमुळे विद्यापीठात मोकाट कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली, हे नक्की. विद्यापीठाच्या मागील भागातील जंगलातून ये-जा करणाऱ्या बिबट्यांच्या जोडप्यांनी काही भाग संचारासाठी निश्चित केले आहे. घनटाद वृक्ष, झाडा-झुडपात ते दडून बसल्याचे सुरक्षा रक्षकांनी अनेकदा बघितले आहे. आतापर्यंत बिबट्याने कुत्र्यांची शिकार केल्याचे वास्तव आहे. मात्र, अलीकडे बिबट्याने विद्यापीठात गर्दी असलेल्या भागाकडे आगेकूच केली आहे. पंधरवड्यापूर्वी कॅन्टीन असलेल्या भागापर्यंत बिबट्याने अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे बिबट सावज शोधण्यासाठी विद्यापीठाच्या कोणत्याही भागात संचार करू शकतो, अशी भीती अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दाटली आहे.
दोन दिवसांपूर्वी वनविभागाच्या भरारी पथकाने विद्यापीठाचा परिसर पिंजून काढला. बिबट्याच्या संचार मार्गाचे परीक्षण केले. जंगलातून बिबट्याचे विद्यापीठात येण्याचे काही मार्ग वनविभागाच्या या चमूला आढळले. त्यामुळे बिबट्याच्या या संचार मार्गावर अतिरिक्त ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविले जाणार आहेत. त्यानुसार वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. एकंदर १० ते १२ कॅमेरे बसविले जातील. त्याकरिता निधी उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
विद्यापीठात यापूर्वी बिबट्याच्या मुख्य मार्गावर ‘ट्रॅप कॅमेरे’ बसविण्यात आले होते. आता पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडून सुरक्षिततेची मागणी आली आहे. त्यामुळे अतिरिक्त कॅमेरे बसवून बिबट्यावर मॉनिटरिंग केले जाईल.
- कैलास भुंबर
आरएफओ, वडाळी.