अतिरिक्त शिक्षक, संच मान्यतेचा प्रश्न विधिमंडळात
By Admin | Updated: March 13, 2017 00:17 IST2017-03-13T00:17:20+5:302017-03-13T00:17:20+5:30
विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शारीरिक शिक्षण व कला या विषयांना शिक्षक उपलब्ध व्हावे...

अतिरिक्त शिक्षक, संच मान्यतेचा प्रश्न विधिमंडळात
शेखर भोयर यांचा पुढाकार : धनंजय मुंडे यांची लक्षवेधी
अमरावती : विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शारीरिक शिक्षण व कला या विषयांना शिक्षक उपलब्ध व्हावे व त्यांच्याकडे या विषयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवावा तसेच संचमान्यतेचे अधिकार विभागस्तरावर देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ नुसार लक्षवेधी सूचना विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात मांडली आहे.
शारीरिक शिक्षकांचे दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या निवेदनानुसार शिक्षक महासंघाचे व्यवस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शारीरिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत धनंजय मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. यावर त्यांनी लगेच हा प्रश्न सभागृहात लक्षवेधी सूचना म्हणून मांडला.
इयत्ता ६ ते १० वीपर्यंत शालेय स्तरावर कला, संगीत व शारीरिक शिक्षण हे विषय शिकविण्या करिता विशेष शिक्षकांची नियुक्ती केली गेली होती. परंतु शिक्षण विभागाच्या नवीन संच मान्यतेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांना सामान्य शिक्षकांप्रमाणेच अन्य विषय देऊन शारीरिक शिक्षकांची पदे केवळ नावापुरतीच शिल्लक ठेवली होती. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील खेळाडू घडविण्याचे काम शारीरिक शिक्षक करीत असून शासनाने हे पद व्यपगत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसविली आहे. त्याचप्रमाणे संच मान्यतेची दुरुस्ती प्रक्रिया ही शिक्षक संचालक कार्यालयात पार पाडल्या जाते. संचमान्यता करणे, शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे व पुन्हा त्यात दुरुस्ती करणे यातच शिक्षक विभागाचा व शिक्षकांचा वेळ जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यासाठी संचमान्यतेच्या दुरुस्तीचे अधिकार शिक्षक उपसंचालक अथवा शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावे, याबाबतही सभागृहात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली.
शासनाच्या धोरणामुळे शिक्षकांची पदे धोक्यात येत असून, शिक्षकांच्या पदावर आघात करण्यात येत आहे. परंतु शासनाचा हा कुटील डाव कदापी यशस्वी होऊ देणार नसल्याचे व शिक्षक बांधवांना त्यांचे न्याय अधिकार परत मिळवून देण्यासाठी शिक्षक महासंघाचा लढा अविरत सुरू ठेवणार असल्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)