सौर दिव्यांची नियमबाह्य खरेदी
By Admin | Updated: July 15, 2015 00:12 IST2015-07-15T00:12:58+5:302015-07-15T00:12:58+5:30
शासनाने सोलर लँप कंपनीची आर. सी. मान्यता रद्द केल्याची लेखी सूचना धारणी पंचायत समितीच्या बीडीओंनी ग्रामसचिवांना कळविल्यानंतरही...

सौर दिव्यांची नियमबाह्य खरेदी
सचिवांचा गैरप्रकार : निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे धूळ खात
राजेश मालवीय धारणी
शासनाने सोलर लँप कंपनीची आर. सी. मान्यता रद्द केल्याची लेखी सूचना धारणी पंचायत समितीच्या बीडीओंनी ग्रामसचिवांना कळविल्यानंतरही तालुक्यातील बिरोटी, चटवाबोड येथील ग्रामसचिवांनी कमिशनपोटी लाखो रूपयांचे लोकोपयोगी सोलर लँप साहित्याची नियमबाह्यरित्या खरेदी केली. त्यांच्यावर रिकव्हरीसह निलंबनाचा प्रस्ताव जि.प.च्या सीईओंकडे पाठविल्याने ग्राम सचिवांमध्ये खळबळ उडाली आहे.
शासनाने २०१३-१४ मधील सोलर लँपची आर.सी. मान्यता रद्द केल्याचे परिपत्रक काढले. त्यानुसार धारणीचे बीडीओ रामचंद्र जोशी यांनी तालुक्यातील ६३ ग्रा. पं.ना लेखी पत्र देऊन लोकोपयोगी साहित्य खरेदी करण्यापूर्वी बीडीओंच्या पूर्व परवानगी घ्यावी, असे सुचविले. शासन आदेश असतानाही ग्रा. पं. बिरोटी, चटवाबोड येथील ग्रामसचिव किशोर सानप, युवराज जाधव यांनी २५ टक्के कमिशन मिळण्याच्या लालसेने लाखो रूपयांचे लोकोपयोगी सोलर लँप साहित्य खरेदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे ग्रामसचिवांना कारणे दाखवा नोटीस देऊन नियमबाह्यरित्या सोलर लँप खरेदी करून शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शासनाचे लाखो रूपयांचा निधीचा दुरुपयोग केल्याने त्यांचेवर रिकव्हरीसह जोडपत्र १ ते ४ तयार करून त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव २६ मे रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविले होते. या प्रस्तावाला दीड महिने झाल्यानंतरही जिल्हा परिषदेकडून दोन सचिवांवर निलंबनाची कारवाई अद्याप न झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सौरदिवे खरेदीच्या घोटाळ्यावर
तीन आमदारांचे तारांकित प्रश्न
मेळघाटातील १०० ग्रा.पं.मध्ये नियमबाह्यरीत्या लाखो रूपयांचे सौरदिवे खरेदी घोटाळा झाल्याचे ‘लोकमत’ने उघड करताच राजेंद्र पाटनी, सुनील देशमुख, यशोमती ठाकूर या तीनही आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सौरदिवे घोटाळ्याशी संबंधित बोगस कंपनी आणि ग्रामपंचायतीच्या सचिवावर कारवाई व्हावी, असे सुचविले. मात्र फक्त १६ ग्रामसचिवांवर २ वार्षिक वेतनवाढ थांबविल्या गेली. त्यांचेवर निलंबन किंवा रिकव्हरीसुद्धा वसूल केली असून सोलर लँप कंपनीवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याने तारांकित प्रश्नाचे अर्थ काय, अशी चर्चा येथे सुरू आहे.
लोकोपयोगी साहित्य खरेदी करू नये, अशी लेखी सूचना सर्व सचिवांना दिली. तरीही बिरोटी, चटवाबोड, सचिव किशोर सानप, युवराज जाधव यांनी नियमबाह्य सौरदिवे खरेदी करून शासन व वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
- रामचंद्र जोशी,
बीडीओ (उच्च श्रेणी १), पं. स. धारणी.