वडाळी, पोहरा जंगलात हेटीचे उच्चाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:58+5:302021-09-24T04:14:58+5:30
अवैध चराई थांबली, कारवाई शून्यावर, जंगलात गवत फोफावले अमोल कोहळे - पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडाळी ...

वडाळी, पोहरा जंगलात हेटीचे उच्चाटन
अवैध चराई थांबली, कारवाई शून्यावर, जंगलात गवत फोफावले
अमोल कोहळे - पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडाळी व पोहरा वर्तुळाच्या जंगलात काठिवाडी पशुपालकांच्या गुरांच्या चराईसाठी लागणारी एकही हेटी या परिसरात उभारली गेली नाही. यंदा अवैध चराईचे या परिसरातून समूळ उच्चाटन झाल्यामुळे कारवाईदेखील शून्यावर आली आहे. दुसरीकडे पाळीव प्राण्यांचा शिरकाव थांबल्याने गवताची उंची भराभर वाढली असून ते माणसांहून उंच झाले आहे.
वर्षानुवर्षाच्या संघर्षानंतर यावर्षी वडाळी आणि पोहरा वर्तुळातील जंगलात काठेवाडी पशुपालक व वनविभाग यांच्यात पाठशिवणीचा खेळ अखेर थांबला. वडाळी आणि पोहरा वर्तुळाच्या जंगलात काठियावाडी पशुपालकांची गुरे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आगमन करीत होते. चार महिन्यांकरिता थांबायचे असल्याने हेटी बांधली जात होती. जंगलात त्यांच्याकडील गुरांचा प्रवेश रोखण्यासाठी वनविभाग दरवर्षी उपाययोजना आखत असला तरीसुद्धा वनविभागाला न जुमानता छुप्या मार्गाने काठियावाडी आपल्या गुरे चरायला सोडत होते.
वनविभागाने या जंगलातून ‘चालते व्हा’ असा निर्वाणीचा इशारा काठियावाडी पशुपालकांना दिला होता. अशातच त्यांच्या गुरांवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने वनविभागाने विशेष मोहीम राबवून जणू नजरकैदेत ठेवले होते. संबंधित वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर, आरसीपी तुकडीच्या मदतीने काठियावाडी गुरांची चराई रोखण्यासाठी वनविभागाने सळो की पळो करून सोडले होते. अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी विशेष मोहीम आरंभली होती. त्याचा जबर फटका बसल्याने यंदा काठेवाडी गुरे व राहुट्या या जंगलात दिसल्याच नाहीत.