प्रवास पास योजनेला मुदतवाढ
By Admin | Updated: June 8, 2017 00:10 IST2017-06-08T00:10:52+5:302017-06-08T00:10:52+5:30
शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून मुलींकरिता असलेल्या अहल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

प्रवास पास योजनेला मुदतवाढ
शेखर भोयर यांचे प्रयत्न : अहल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून मुलींकरिता असलेल्या अहल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील २२ लाख विद्यार्थिनींना होणार आहे. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन या विषयाचे गांभिर्य त्यांना समजावून सांगितले होते.
महाराष्ट्रात मुलींकरिता अहल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजना राबविण्यात येते परंतु या योजनेचा कालावधी हा ३१ मार्चपर्यंत होता. वास्तविकता विद्यार्थिनींना एप्रिल महिन्यातही विविध छंद शिबिर असल्याने तसेच प्रात्यक्षिकसाठी एप्रिल महिन्यातही शाळेत यावे लागते. अशा वेळेस त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता या योजनेची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्यामुळे राज्यातील २२ लाख विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी शेखर भोयर यांनी विविध विषयावर चर्चा केली. शाळांना सरसकट पाचवी व आठवी जोडण्याच्या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शारीरिक व कला शिक्षकांच्या तासिका पूर्ववत ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा यावेळी पार पडली.
यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन व समायोजन तसेच संचमान्यता दुरूस्तीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. १ व २ जुलै रोजीच्या शाळांना अनुदान देण्याबाबत तसेच उरलेल्या शाळांना घोषित करून अनुदान देण्याबाबतची चर्चा यावेळी पार पडली.
१ नोव्हेबर २००५ पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षकांना जुनीच पेंशन योजना लागू करण्यात यावी, याविषयी चर्चा करण्यात आली. यावर लवकरच आपण सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचे शेखर भोयर यांनी सांगितले.