महापालिकेत बनावट सफाई कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

By Admin | Updated: May 9, 2015 00:33 IST2015-05-09T00:33:54+5:302015-05-09T00:33:54+5:30

महापालिका आस्थापनेवर असणाऱ्या बनावट सफाई कर्मचाऱ्यांची शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.

Explanation of fake cleaning workers in municipal corporation | महापालिकेत बनावट सफाई कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

महापालिकेत बनावट सफाई कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

आयुक्तांचे संकेत : घरी बसून वेतन घेणाऱ्यांची आता खैर नाही
अमरावती : महापालिका आस्थापनेवर असणाऱ्या बनावट सफाई कर्मचाऱ्यांची शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. खऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून बनावट नावाने घरी बसून वेतन घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका आस्थापनेवर ७३८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. पाच झोननिहाय या सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सफाई कर्मचारी म्हणून काही श्रीमंत व्यक्तींची नावे आस्थापनेवर असून त्यांच्या जागी गरीब, सामान्य कर्मचाऱ्यांकडून तोकड्या रक्कमेवर सफाईची कामे करून घेतली जातात. परंतु वेतन मात्र आस्थापनेवर असलेल्या श्रीमंत व्यक्तिंच्या नावे काढले जात असल्याची धक्कादायक बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आस्थापनेवरील बनावट कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सध्या स्वच्छता विभाग आयुक्तांचे लक्ष्य असल्यामुळेच गुरुवारी स्वच्छता विभाग प्रमुख देवेंद्र गुल्हाने यांच्यावर देयकांत अनियमिततेचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली. स्वच्छता विभागात गौडबंगाल असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे आयुक्त गुडेवार यांनी पाचही झोनमध्ये आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आस्थापनेवरील सफाई कर्मचारीच कामे करतात की त्यांच्या नावे दुसरी व्यक्ती कार्यरत आहे, हा शोध घेण्याची मोहीम सुरु होणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार स्वच्छता विभागाकडून सफाई कर्मचाऱ्यांची यादी मागविली असून ‘आॅन दी स्पॉट’ शोध घेण्याचे आयुक्तांनी ठरविले आहे. बनावट कर्मचारी आढळल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी सतत गैरहजर राहणाऱ्या ११ सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. आयुक्तांच्या भीतीने सफाई कर्मचारी वेळेवर पोहोचत आहेत.

सब कॉन्ट्रक्टनुसार काही सफाई कर्मचारी कार्यरत असून ते २५ हजार रुपये वेतन घेत चक्क दुचाकीने फिरतात, याची कल्पना आहे. यासंदर्भात स्वच्छता विभागप्रमुख देवेंद्र गुल्हाने यांना माहिती विचारली तेव्हा ते खोटे बोलले. बनावट कामे करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा १०० टक्के शोध घेऊन थेट फौजदारी कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका.

Web Title: Explanation of fake cleaning workers in municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.