बच्चू कडंूसोबतचे अनुभव ‘कडू’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:08 IST2018-01-12T23:08:08+5:302018-01-12T23:08:36+5:30
परतवाड्यात राहताना ‘बच्चू कडू यांचे भाड्याचे घर’ अशी पाटी लागते, तर दुसरीकडे ते मुंबईत ४२ लाखांची सदनिका विकत घेतात.

बच्चू कडंूसोबतचे अनुभव ‘कडू’च
आॅनलाईन लोकमत
अमरावती : परतवाड्यात राहताना ‘बच्चू कडू यांचे भाड्याचे घर’ अशी पाटी लागते, तर दुसरीकडे ते मुंबईत ४२ लाखांची सदनिका विकत घेतात. निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांनी खोटी माहिती सादर केली, असा आरोप चांदूर बाजार नगरपालिकेचे शिक्षण व बांधकाम सभापती गोपाल तिरमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला. बच्चू कडू यांचा स्वीय सहायक असताना आलेले अनुभव कडू असल्याचे ते म्हणाले.
गोपाल तिरमारे म्हणाले, अचलपूर मतदारसंघाची निवडणूक लढविताना बच्चू कडू यांनी एक-एक रुपया गोळा के ला होता. लोकांनी त्यांना मदत केली, निवडून दिले. सोफिया प्रकरणाच्या वेळी ते अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत लढण्याचा दावा करीत होते. त्यांचा तो लढवय्या बाणा आता कुठे उरला आहे? विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आर्थिक तडजोड केली.
बच्चू कडू यांची साथ सोडल्यावर त्यांनी मुंबईत खरेदी केलेल्या सदनिकेची माहिती गोळा करीत होतो. त्यांनी सदनिका घेण्यासाठी कर्ज काढले. याचा उल्लेख त्यांनी निवडणूक अर्जात केला; सदनिकेचा उल्लेख का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्याविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी व सामान्य प्रशासन विभाग प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली असल्याचे तिरमारे यांनी सांगितले. सदनिकेसंदर्भात त्यांनी पंधरा दिवसांत खुलासा करावा, असेही गोपाल तिरमारे म्हणाले. पत्रपरिषदेला योगेश पवार, आनंद अहिर, मुरली माकोडे, जितू मस्करे, रूपेश लहाने, गजानन राऊत उपस्थित होते.
...म्हणून माझ्यावर गुन्हा
आमदार बच्चू कडू यांच्या सदनिकेची माहिती घेत असल्यानेच फ्रेजरपुरा ठाण्यात माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असावा. तो खोटा असल्याने रद्द होईलच, असेही ते म्हणाले. उमेदवारी अर्ज भरताना दिलेली माहिती खोटी असल्याचा आम्ही पुरावा दिला असून, त्यासंदर्भात आसेगाव ठाण्यात तक्रार केली आहे, असेही गोपाल तिरमारे म्हणाले.
यावर मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. माझा कुठलाही कार्यकर्ता प्रतिक्रिया देईल.
- बच्चू कडू
आमदार, अचलपूर