महानगरपालिकेत ‘स्मार्ट सिटी’ची लगबग
By Admin | Updated: January 1, 2015 22:53 IST2015-01-01T22:53:59+5:302015-01-01T22:53:59+5:30
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य शासनाने प्रमुख १० शहरे ही ‘स्मार्ट सिटी’ म्हणून बनविण्याचा संकल्प सोडला आहे. त्याअनुषंगाने या स्मार्ट सिटीत अमरावतीचा समावेश व्हावा,

महानगरपालिकेत ‘स्मार्ट सिटी’ची लगबग
विभाग प्रमुखांची बैठक : १० शहरांत अमरावतीचा समावेश
अमरावती : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य शासनाने प्रमुख १० शहरे ही ‘स्मार्ट सिटी’ म्हणून बनविण्याचा संकल्प सोडला आहे. त्याअनुषंगाने या स्मार्ट सिटीत अमरावतीचा समावेश व्हावा, याकरिता महापालिकेत लगबग सुरु झाली आहे. आयुक्त अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांची गुरुवारी बैठक पार पडली.
नागरिकांना क्षणात सोयीसुविधा मिळण्यासह अत्याधुनिक प्रणालीचा वापर करणे, स्मार्ट सिटी या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. २००६ मध्ये आयबीएम सॉफ्टवेअर कंपनीने स्मार्टर प्लॅनेट ही संकल्पना पुढे आणली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देशात १०० शहरे ही ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा संकल्प घेतला आहे.
या स्मार्ट सिटीची संकल्पना महाराष्ट्रात पूर्णत्वास आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊल उचलले आहे. राज्यात १० शहरे ही स्मार्ट सिटी बनवायची असल्यामुळे आवश्यक पायाभूत सुविधा, पाणी व्यवस्था, घणकचरा, आरोग्य सुविधा, सांडपाणी निचरा, शिक्षण, रस्ते आदींचा समावेश राहणार आहे. स्मार्ट सिटीसाठी आवश्यक सर्व बाबींवर भर दिला जाणार आहे.
अमरावती ‘स्मार्ट सिटी’ साठी पालकमंत्री आग्रही
अमरावती जिल्ह्याचे नेतृत्व सांभाळणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, खणिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे हे अमरावती शहर ‘स्मार्ट सिटी’ बनावे यासाठी फारच आग्रही आहेत. जी १० शहरे स्मार्ट सिटी राज्य शासन बनविणार आहे, त्यात अमरावती शहराचा समावेश असलाच पाहिजे, त्याकरिता ना. पोटे यांची धडपड सुरु झाली आहे. भविष्यात ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष पॅकेजदेखील मिळणार आहे, हे विशेष.
डीपीसीच्या बैठकीत सादर होणार प्रस्ताव
जिल्हा नियोजन समितीच्या येत्या बैठकीत अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’ समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करुन तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्याकरिता महापालिकेने पुढाकार घेतला असून हा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी कन्सलटन्सी संदीप देशमुख यांच्या शिरावर सोपविण्यात आली आहे.