अनेक शेतकरी वर्षभरापासून प्रतीक्षेत
दर्यापूर : तालुक्यातील खचलेल्या व बुजलेल्या अशा ७८ विहिरी शेतकऱ्यांनी स्वखर्चातून बांधून काढल्या. या विहिरींची समावेश ............... योजनेत केल्याने शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपाने खर्च केलेली रक्कम परत मिळणे अपेक्षित होते. मात्र, एक वर्षापासून प्रतीक्षा करूनही शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही.
दर्यापूर तालुक्यातील जवळपास १४४ विहिरींचा योजनेत समावेश करण्यात आला. त्यातील ७८ विहिरी शेतकऱ्यांनी आपल्या खर्चातून तयार केल्या. त्यातील काहींना पैसे मिळाले. मात्र, अजूनही अनेकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी या कामात प्रसंगी मजुरांना आपल्या जवळचा पैसा दिला. मात्र, आजवर केवळ कार्यालयात खेटे घालण्यापलीकडे काहीच हाती आले नाही. खचलेल्या विहिरी पुनरुज्जीवित करून संरक्षित ओलित करण्याच्या प्रयत्नात शासनाने योजना राबविली खरी, मात्र योजनेत शेतकऱ्यांना आजवर केवळ प्रतीक्षाच पदरी पडली. आधीच कर्जात आकंठ बुडालेल्या शेतकऱ्यांना या योजनेने आणखी कर्जात लोटण्याचे कार्य केल्याची भावना आता शेतकऱ्यांत बळावू लागली आहे. वर्षभरापासून कार्यालयीन चकरा मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता तरी शासन निधी वितरित करणार का, असा सवाल केला आहे.