कासव पाळणारा व्यायाम प्रशिक्षक वनविभागाच्या ताब्यात
By Admin | Updated: September 2, 2016 00:10 IST2016-09-02T00:10:19+5:302016-09-02T00:10:19+5:30
घरात कासव पाळणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाला वनविभागाने बुधवारी रात्री महालक्ष्मीनगरातून ताब्यात घेतले.

कासव पाळणारा व्यायाम प्रशिक्षक वनविभागाच्या ताब्यात
दोन कासव जप्त : महालक्ष्मी नगरातील घटना
अमरावती : घरात कासव पाळणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाला वनविभागाने बुधवारी रात्री महालक्ष्मीनगरातून ताब्यात घेतले. रविंद्र पंढरीनाथ जरूदे (रा.महालक्ष्मीनगर,अंबाविहार) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे शहरात कासव विकणारे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही.पडगव्हाणकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी तसेच शिकार प्रतिबंधक पथकाचे आरएफओ वाजगे, वानखडे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक मनोज ठाकूर, अमित शिंदे यांनी रविंद्र जरूदेकडे धाड टाकली. झडती दरम्यान फिशपॉटमध्ये दोन कासव आढळून आले. पोलिसांनी दोन्ही कासव जप्त करून रविंद्रला ताब्यात घेतले. याप्रकरणात वनविभागाने आरोपीविरुद्ध वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे.
वन्यजीव घरी पाळल्यास कारवाई
वन्यजीव अधिनियमातील प्राणी व पक्षी घरात पाळणे हा गंभीर गुन्हा आहे. पोपट व कासव हे वन्यजीव पाळणे गुन्हा ठरतो. त्यामुळे पोपट, कासव तसेच अन्य वन्यजीव पाळल्यास वनविभाग कारवाई करणार आहे. घरात वन्यजीव पाळू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वन्यजीव आढळल्यास तत्काळ वनविभागाला कळवा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.