बदली धोरणामध्ये शिक्षकांची विशेष गुणवत्ता बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:21+5:302021-03-31T04:13:21+5:30
अमरावती : सध्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये चर्चा फक्त बदल्यांची आहे. किंबहुना बदल्यांबाबतचे धोरण नेमके काय ठरते, याची उत्सुकता सर्व ...

बदली धोरणामध्ये शिक्षकांची विशेष गुणवत्ता बेदखल
अमरावती : सध्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये चर्चा फक्त बदल्यांची आहे. किंबहुना बदल्यांबाबतचे धोरण नेमके काय ठरते, याची उत्सुकता सर्व शिक्षक व शिक्षक संघटना यांना लागून आहे. या सगळ्या बदलीपुराणामध्ये गुणवंत शिक्षकांच्या ज्ञानदानाला मात्र कोणतीही किंमत नाही. पाट्या टाकणारे व काळ-वेळेच्या पलीकडे योगदान देत मुले घडविणारे शिक्षक हे सारे जणू एकाच मापाने मोजले जात आहेत. त्यामुळे क्षमतावान असणारे अनेक शिक्षक नाउमेद होण्याचादेखील धोका आहे.
काही शिक्षक १० ते ५ या शालेय कामकाजाच्या वेळेच्या पलीकडे जात प्रज्ञा शोध, शिष्यवृत्ती,नवोदय यांसारख्या परीक्षांसाठी कष्ट उपसत असतात. शाळेत ठरवून दिलेल्या वेळेपक्षा जास्त काम करणारे शिक्षकदेखील आहेत. हे शिक्षक विद्यार्थी घडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देतात. पण, याचा बदलीच्या धोरणामध्ये काडीमात्र विचार होत नाही. आजवर अगदी अर्ध्या ते अनेक डझन मुले शिष्यवृत्ती किंवा नवोदयमध्ये आणलेले तसेच एकूण नोकरीमध्ये असा एकही विद्यार्थी विशेष गुणवंत घडू न शकणारे असे सारे शिक्षक एका मापाने मोजले जातात. ही खंत काही गुणवंत शिक्षक बोलूनदेखील दाखवत आहेत. किंबहुना या शिक्षकांना बदलीत थोडी तरी सवलत हवी. पण, यांनाच खो घालून गुणवत्ता विकासाला मोडता घालण्याचा प्रकार घडत आहे. कोणत्याही खासगी, सहकारी क्षेत्रात बदली बढतीसाठी गुणवत्तेचा, विशेष कार्याचा विचार आवर्जून होतो. मात्र, पिढी घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्रात मात्र हे घडत नाही. बदली धोरणात या मुद्यांचा समावेश व्हावा, यासाठी संघटना व नेते यांनी दाद मागायला हवी, अशी मागणी शिक्षकांमधून उमटत आहे.