आरोपाने व्यथित सीईओंचे सभेतून बहिर्गमन
By Admin | Updated: July 30, 2016 00:06 IST2016-07-30T00:06:03+5:302016-07-30T00:06:03+5:30
भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले.

आरोपाने व्यथित सीईओंचे सभेतून बहिर्गमन
जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेतील प्रकार
अमरावती : भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले.
शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी. सीईओंचा संताप बघून जि.प.पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना जाहीर माफी मागून सभागृहात परत आणले. नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेचे प्रकरण काही महिन्यांपासून स्थायी समितीत गाजत आहे. जि.प. सदस्यांच्या मागणीनुसार सीईओंनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालून अधिनस्थ अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्यात. मात्र, यातून कोणतेच तथ्य निघाले नसल्याचे मत सदस्य रवींद्र मुंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या अनियमिततेकडे प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीईओंचे लक्ष नाही. ते भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुंदे यांनी केला. यामुळे सीईओंचा पारा चढला आणि मुदेंच्या वक्तव्यावर प्रखर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘साहेब, उभ्या आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केला नाही आणि करू दिला नाही. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करा. माझ्या कार्यप्रणालीवर संशय असेल तर अविश्वास आणा’.
तत्पूर्वी उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी सभागृहाच्यावतीने जाहीर माफी मागितली. सीईओंचा संताप पाहून काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे अभिजित ढेपे यांनी सीईओंची बाहेर जाऊन समजूत काढली व मनधरणी करून त्यांना सभागृहात परत आणले. परिणामी सभेतील इतर मुद्यांवरील चर्चा मागे पडले. या घटनेनंतर अर्ध्या तासांत ही सभा गुंडाळण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात सभेतील हा विषय बराच काळ चघळला गेला. (प्रतिनिधी)
प्रशासकीय सेवेत आलो तेव्हापासून नव्हे त्याआधीपासून कधीही भष्ट्राचार केला नाही आणि कुणालाही पाठबळ दिले नाही. ती माझी संस्कृती नाही. तरीही ज्यांना कुणाला असे वाटत असेल त्यांनी असले आरोप सिद्ध करावेत आणि मगच बोलावे. असे आरोप कदापीही खपवून घेणार नाही.
सुनील पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
मग्रारोहयोचा लाभ मिळवून देण्याकरिता नांदगाव पं.स.मध्ये पैसे मागितले जातात. या प्रकरणाची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, ती झाली नाही. त्यामुळे अपहार करणाऱ्यांना सीईओ खतपाणी घालतात का, असा सवाल मी उपस्थित केला. सीईओंवर भष्ट्राचाराचा आरोप केला नाही.
-रविंद्र मुंदे
जिल्हा परिषद सदस्य