शैक्षणिक धोरणासाठी विद्यार्थ्यांची चाचणी
By Admin | Updated: April 30, 2015 00:19 IST2015-04-30T00:19:26+5:302015-04-30T00:19:26+5:30
राज्यातील शिक्षणविषयक धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे.

शैक्षणिक धोरणासाठी विद्यार्थ्यांची चाचणी
सर्वेक्षण : शाळांसह घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे परीक्षण
जितेंद्र दखणे अमरावती
राज्यातील शिक्षणविषयक धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांच्या मराठी, इंग्रजी व गणित विषयातील ज्ञानाच्या तपासणीसाठी शाळेत व घरी जाऊन चाचणी घेतली जात आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद राज्याच्या शैक्षणिक धोरणांवर मोठा परिणाम करणारी संस्था आहे. परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यातील शाळा, विद्यार्थी व शिक्षकांचे विविध प्रकारे सर्वेक्षण करुन धोरण ठरविण्यात येते. सध्या प्रचलित असलेले अभ्यासाबाबत व आगामी होणारे बदल याचीही जबाबदारी परिषदेवरच असते. आता परिषदेने विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पध्दतीने तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यासह राज्यातही मोहीम राबविण्यात येत आहे. मराठी, इंग्रजी व गणित विषय शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. एकूण शैक्षणिक प्रगती या विषयांवर अवलंबून असते. त्यामुळे या विषयांची चाचणी घेण्यात येत आहे. जिलतील विविध शाळांमध्ये जाऊन १०० विद्यार्थ्यांना परत विचारले जातात आणि या विद्यार्थ्यांना सोडून अन्य १०० विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन परीक्षण करणे सुरू आहे. यासाठी जिल्ह्याभरात८४ सधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. ते प्रथमत: शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची चाचणी घेत आहेत. नंतर गावात, शहरात फिरुन खेळणाऱ्या तसेच बाहेर फिरणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जात आहे. काही सधन व्यक्तींनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
यामुळे घरात चाचणी
परीक्षा चाचणीत यश मिळवताना मानसिकतेचाही मोठा वाटा असतो. मानसिकता चांगली असलेला विद्यार्थी व्यवस्थितपणे उत्तरे लिहू शकतो. त्याचप्रमाणे अभ्यासाचेही आहे. चांगली मानसिकता असणारे विद्यार्थी अभ्यास चांगल्या पद्धतीने करु शकतात. अभ्यास त्यांच्या लक्षात राहू शकतो याचा त्यांना पेपर लिहिताना फायदा होतो. विद्यार्थ्यांची मानसिकता घरात चांगली राहू शकते की शाळेत याचा अंदाज घेण्यासाठी घराघरांतही चाचणी घेतली जात आहे. यातून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा मागोवा घेता येणार आहे. यावरुनच शाळेतील वातावरण कसे ठेवावे याबाबत निर्देश दिले जातील.
सर्व प्रकारच्या शाळा
सर्वेक्षण करताना शाळांबाबत वर्गीकरण करण्यात आलेले नाही. कोणत्याही प्रकारच्या शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, आश्रमशाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे.
वजाबाकीवर भर
गणिताच्या चाचणीमध्ये वजाबाकीवर भर देण्यात येत आहे. यामध्ये गणित सोडविण्यासाठी दिले जातात. वजाबाकी आल्यानंर भागाकाराचे गणित सांगितले जाते. चुकल्यास अंक ओळखीवर भर देण्यात येतो. ५ पैकी ४ अंक ओळखता आल्यास केवळ अंक ओळख होते.
इंग्रजीचा निष्कर्ष
इंग्रजी भाषेच्या चाचणीत अर्थ समजणे आवश्यक आहे. स्मॉल व कॅपिटल प्रकारात शब्द व अक्षर ओळखण्यास दिले जाते. काही वाक्यही सांगितली जातात.वाक्य वाचून त्याचा अर्थ समजल्यावर इंग्रजीची ओळख होते.
१ ते ८ चे विद्यार्थी
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाला पूर्ण शैक्षणिक आयुष्याचा पाया मानला जाता. या इयत्तांमध्ये मिळालेल्या शिक्षणातून पुढचे शैक्षणिक आयुष्य बहरत जाते. यामुळे याच इयत्तांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चाचणीच्या माध्यमातून निरीक्षण केले जात आहे. चाचणीची रुपरेषाही या विद्यार्थ्यांना झेपेल अशीच आहे. त्यांना अगदी सोपे प्रश्न विचारुन त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीने अवलोकन करण्यात येणार आहे. यातून प्राथमिक शिक्षणाचे ठोस शैक्षणिक धोरण ठरवितांना याची मोठी मदत होणार आहे.
अशी होते विद्यार्थ्यांची चाचणी
मराठी वाचन क्षमता, मराठी विषयाच्या चाचणीत प्रथमता एक. छोटासा परिच्छेद वाचण्यास देण्यात येतो. नंतर एक गोष्ट वाचण्यासाठी दिली जाते. परिच्छेदामध्ये वाचण्यात चुका झाल्यास गोष्टीऐवजी अक्षर व शब्द वाचण्यास दिले जातात. यामध्ये पाचपैकी चार अक्षर व शब्द वाचता आल्यावर विद्यार्थ्यांची वाचनातील प्रगती असल्याचे समजण्यात येते.
शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी अशा चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. ही चाचणी तंत्रशुध्दपणे कोणतीही सुटी न ठेवता घेण्यावर भर आहे. यासाठी सधन व्यक्तीची मदत घेण्यात येत आहे. याचा अहवाल परिषदेला पाठविण्यात येईल. परिषदेकडून यासंदर्भात निष्कर्ष काढला जाईल.
- प्रतिभा तायडे, प्राचार्य, डायट.