दरवर्षी येलकीच्या शिवमंदिराला पडतो पुराचा वेढा
By Admin | Updated: May 24, 2016 00:40 IST2016-05-24T00:40:05+5:302016-05-24T00:40:05+5:30
अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील शिवसंस्थान व शंकर प्रतिष्ठानला पुराचा अक्षरश: वेढा पडतो. हे मंदिर पाण्याखाली जाते.

दरवर्षी येलकीच्या शिवमंदिराला पडतो पुराचा वेढा
जलसंधारण मंडळाचे दुर्लक्ष : बंधारा वाहून गेला, संरक्षण भिंत बांधणार केव्हा ?
अमरावती : अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील शिवसंस्थान व शंकर प्रतिष्ठानला पुराचा अक्षरश: वेढा पडतो. हे मंदिर पाण्याखाली जाते. पूर्णा नदीला जुलै २०१४ साली आलेल्या पुरामुळे नदीकाठचा पूलवजा बंधारा वाहून गेल्याने या मंदिराला संरक्षण भिंत बांधण्याची अत्यंत गरज आहे. परंत लघुसिंचन जलसंधारण मंडळाचे दुर्लक्ष असल्याने पावसाळ्यात या देवस्थानात येणाऱ्या भाविकांना एक तर दर्शन टाळावे लागते किंवा पोहून त्याठिकाणी जावे लागते.
पूर्णा नदीला सन २०१४ साली मोठा पूर आला होता. येलकी पूर्णा हे गाव खारपाणपट्ट्यात येते. या भागातील नदीचे काठ मऊ स्तरातील असल्याने येथील बंधारा विंग वॉलसह क्षतिग्रस्त झाला होता. लघुसिंचन जलसंधारण मंडळाने देखील ही बाब मान्य केली आहे. वास्तविक ही संरक्षण भिंत व पूलवजा बंधारा चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आला होता. परंतु अद्यापही हे काम झालेले नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चुकीच्या ठिकाणी बंधारा व संरक्षण भिंतीचे बांधकाम केल्याने पुलवजा बंधारा तुटल्याचा आरोप येलकी पूर्णा येथील शिवसंस्थान व शंकर प्रतिष्ठानचे सचिव कैलास राऊत यांनी केला आहे. क्षतिग्रस्त बंधाऱ्याचा उर्वरित भाग नदीपात्रात तसाच शिल्लक आहे. त्यामुळे नदीपात्रातील पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पुराचा फुगवटा निर्माण होत असल्याने उजव्या बाजूकडील नदीच्या कडा विस्कळीत होऊन तेथे मोठा खड्डा पडेलला आहे. त्यामुळे मंदिराला व गावाकडच्या भागाला पुराचा धोका संभवतोे. यामुळे मनुष्यहानी तसेच आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. याबाबत सन २०१४ पासून निवेदन अर्ज देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. यासर्व प्रकरणात संबंधित अधिकारी टोेलवाटोलवीची उत्तरे देत असून चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर करीत असल्याचा आरोेपही कैलास राऊत यांनी केला आहे.