व्हिसीला आता दर सोमवारी डीएचओ, सीएसची हजेरी
By Admin | Updated: March 7, 2017 00:22 IST2017-03-07T00:22:15+5:302017-03-07T00:22:15+5:30
दर सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध मुद्यांवर दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य ...

व्हिसीला आता दर सोमवारी डीएचओ, सीएसची हजेरी
अप्पर सचिवांची सूचना : जिल्हाधिकारी, सीईओंनी बैठकी असल्यास द्यावी मुभा
अमरावती : दर सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध मुद्यांवर दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात येते. मात्र या व्हिसीला बरेचदा जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) आणि जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) विविध जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे आयोजित बैठकीला जात असल्याने गैरहजर राहतात. त्यामुळे आरोग्याच्या महत्वाच्या विषयावर चर्चा व आढावा योग्यरीत्या घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे सोमवारी आरोग्य विभागाच्या व्हि.सी.च्या वेळेत डिएचओ आणि सीएस या अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थितीतून मुभा द्यावी अशा सुचना आरोग्य विभागाच्या अपर सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेला लेखी स्वरूपात दिल्या आहेत.
जिल्ह्याचा आरोग्यविषयक बाबींवरील आढावा दर सोमवारी दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, आयुक्त आरोग्य सेवा,आणि संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात येतो.या आढाव्याचे वेळी आरोग्य विभागाचे सर्व कार्यक्रम प्रमुख,उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सक तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी उपस्थित असतात. या व्हि.सी.मध्ये केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा आढावा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवायच्या योजना, कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना जिल्हास्तरावर येणाऱ्या तांत्रिक , प्रशासकीय तसेच वित्तीय बाबीवरील अडचणी,व उपाययोजना तसेच विहीत कालमर्यादा करावयाच्या महत्वाच्या बाबींचे नियोजन व अन्य महत्वाच्या प्रकरणी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आदी कामकाज या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होत आहे.
अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित नसतात. या अधिकाऱ्यांच्या अनुउपस्थितीबाबत विचारणा केली असता सदर अधिकारी जिल्हाधिकारी अथवा मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी आयोजित बैठकीसाठी गेल्याचे प्रतिनिधीकडूृन सांगण्यात येते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील सुचनांचे पालन व कामकाजात अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आरोग्यविषयक कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सच्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आमंत्रित करण्यात येऊ नये, असे निर्देश आरोग्य विभागाच्या अप्पर सचिवांनी जिल्हाधिकारी व सीईओंना दिले आहेत. (प्रतिनिधी)