अखेर मग्रारोहयोच्या मजुरांचे वेतन निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:59+5:302021-03-17T04:13:59+5:30
दोन कोटींचा निधी मंजूर, बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात परतवाडा : मेळघाटातील मग्रारोहयो अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी मजुरांचे ...

अखेर मग्रारोहयोच्या मजुरांचे वेतन निघाले
दोन कोटींचा निधी मंजूर, बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात
परतवाडा : मेळघाटातील मग्रारोहयो अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी मजुरांचे दोन कोटींपेक्षा अधिकचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आदिवासींचा महत्त्वपूर्ण होळी सण त्यांना आनंदात साजरा करता येणार आहे. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेतली.
राज्यात मग्रारोहयो अंतर्गत हजारो मजुरांच्या हाताला काम देण्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चिखलदरा व धारणी तालुक्यातील आदिवासी मजुरांचे वेतन तीन महिन्यांपासून अडकले होते. होळी हा सर्वांत महत्त्वाच्या सणापूर्वी वेतन मिळावे, यासाठी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीसुद्धा रोजगार हमी मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. आदिवासी मजुरांची होळी अंधारात जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रशासकीय स्तरावर गंभीर दखल घेत तात्काळ पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार मग्रारोहयो अंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांचे आतापर्यंतचे वेतन मंजूर झाले.
कोट
मग्रारोहयो अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शासनाने दोन कोटी रुपयांहून अधिक तरतूद चिखलदरा तालुक्यासाठी तात्काळ केली आहे.
माया माने, तहसीलदार, चिखलदरा