अखेर दुकाने निरीक्षक दिघडेंची उचलबांगडी
By Admin | Updated: June 13, 2017 00:02 IST2017-06-13T00:02:51+5:302017-06-13T00:02:51+5:30
सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक संजय दिघडेंची अखेर उचलबांगडी झाली. त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बदली करण्यात आली आहे.

अखेर दुकाने निरीक्षक दिघडेंची उचलबांगडी
हुक्का पार्लर प्रकरण : उमरखेड येथील पदभार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक संजय दिघडेंची अखेर उचलबांगडी झाली. त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बदली करण्यात आली आहे. हुक्का पार्लर प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे.
अड्डा २७ व कसबा या दोन्ही हुक्का पार्लरच्या चालकांजवळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शॉप अॅक्टचे नोंदणी प्रमाणपत्र आढळले होते. त्यामुळे बजरंग दलाने सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देऊन हुक्का पार्लर चालकांवर फौजदारी कारवाईची मागणी केली होती. सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत दोन्ही हुक्का पार्लरसह चार पार्लरची नोंदणी रद्द करण्यात आली होती. चुकीच्या पध्दतीने नोंदणी करून शासनाची दिशाभुल व फसवणूक करणाऱ्या हुक्का पार्लरचालकांवर फौजदारी कारवाई करावी, यासंबंधाने दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांनी कोतवाली, तर संजय दिघडेंनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, ती तक्रार अपूर्ण असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी हुक्का पार्लरच्या दस्ताऐवजांची मागणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्राद्वारे केली. मात्र, दोन्ही दुकान निरीक्षकांनी १५ दिवस आजारापणाची रजा घेतली होती. दरम्यान सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने महाआॅनलाईनकडून ते दस्तऐवज प्राप्त केले. त्यानुसार कांबळे यांनी प्राप्त केलेले दस्तऐवज कोतवाली ठाण्यात सादर करण्यात आली. मात्र, अद्याप दिघडे यांनी केलेल्या अपूर्ण तक्रारीसंबंधित दस्तऐवज गाडगेनगर पोलिसांना प्राप्त झाले नाही. याप्रकरणी दिघळे यांच्या कामकाजाची चाचपणी करून सहायक कामगार आयुक्तांनी प्रशासकीय कारवाई करीत त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती सूत्रानी दिली.