अखेर थेट फाईलींचा प्रवास थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:54+5:302021-01-19T04:15:54+5:30
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामासंदर्भातील शासकीय फाईली वरिष्ठांकडे पाठविताना डाकेव्दारे न पाठविताच थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करण्यात ...

अखेर थेट फाईलींचा प्रवास थांबला
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामासंदर्भातील शासकीय फाईली वरिष्ठांकडे पाठविताना डाकेव्दारे न पाठविताच थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येत होत्या. या प्रकारावर प्रभारी अतिरिक्त मुख्यकार्यकारी तुकाराम टेकाळे यांनी बांधकामच्या कार्यकारी अभियंत्याना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. ही नोटीस बजावताच कामांच्या फाईली थेट सादर करण्याचा प्रकार बंद करण्यात आला आहे.
कुठल्याही शासकीय कामांच्या फाईल्स आवक - जावक नाेंदी घेऊनच नियमानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांसंदर्भातील नस्त्या ह्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी किंवा कामांच्या मान्यतेसाठी सादर करताना या नस्त्या कंत्राटदार थेट स्वत:च हातात घेऊन येत असल्याचा प्रकार पाहून यावर अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परिणामी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला नोटीस बजावून यासंदर्भात तात्काळ खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय यापुढे कुठल्याही फाईली ह्या थेट कंत्राटदारामार्फत न पाठविता त्या नियमानुसारच सादर कराव्या, अशी सूचनासुद्धा देण्यात आली होती. प्रभारी अतिरिक्त सीईओंच्या दणक्यामुळे आता थेट फाईलींचा प्रवास थांबला आहे.
कोट
बांधकाम विभागाकडून येणाऱ्या फाईल या डाकेव्दारा न पाठविता त्या थेट कंत्राटदार घेऊन येत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर हा प्रकार बंद झाला.
- तुकाराम टेकाळे
प्रभारी अतिरिक्त सीईओ,
जिल्हा परिषद