अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पाळला ‘प्रोटोकॉल’
By Admin | Updated: November 8, 2014 00:46 IST2014-11-08T00:46:26+5:302014-11-08T00:46:26+5:30
दर्यापूरचे नवनियुक्त आ. रमेश बुंदिले यांना मंचावर बसावयास चक्क खुर्ची नसल्यामुळे जिल्हाधिकारी ..

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पाळला ‘प्रोटोकॉल’
अमरावती : दर्यापूरचे नवनियुक्त आ. रमेश बुंदिले यांना मंचावर बसावयास चक्क खुर्ची नसल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी त्यांना खुर्ची रिकामी करुन देत ‘प्रोटोकॉल’ पाळला. मात्र, आयोजकांनी काहीच सौजन्य दाखविले नाही. निमित्त होते, धारणी येथील कृषितंत्र विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मेळघाटातील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी धारणीत दाखल झाले. कुसुमकोट (खुर्द) येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठव्दारे संचालित कृषितंत्र विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर खा. आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु रविप्रकाश दाणी, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, राज्यपाल कार्यालयाचे सचिव रस्तोगी, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अधिष्ठाता विलवेकर, परिमल सिंग, रुपेश रघुवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरु दाणी यांनी प्रास्ताविक केले.
राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट, खा. आनंदराव अडसूळ यांनी मनोगतातून विचार मांडले. शेवटी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मार्गदर्शन केले. राज्यपालांचे मार्गदर्शनपर भाषण अंतिम टप्प्यात असताना आ. रमेश बुंदिले हे मंचावर आले. थेट ते खा. अडसूळ यांच्याजवळ गेलेत, खासदारांसोबत हस्तांदोलन केले. त्यांच्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये काहीसा हशा पिकला. परंतु बुंंिदले यांना बसावयास खुर्ची नसल्यामुळे ते काही वेळ अस्वस्थ झालेत. आयोजकांनी त्यांच्यासाठी खुर्ची आणण्याची धावपळही चालविली. मात्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे भाषण अंतिम टप्प्यात असल्याने खुर्ची मंचावर येत नसल्याचे बघून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी त्यांची खुर्ची रिकामी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मंच सोडला. त्यानंतर लगेच आ. बुंदिले हे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आसनस्थ झाले. कार्यक्रमादरम्यान आमदारांना दहा मिनिटांपर्यंत खुर्चीची व्यवस्था न होणे, म्हणजे लोकप्रतिनिधींचा अपमान मानला गेला. मात्र जिल्हाधिकारी गित्ते यांनी लोकप्रतिनिधींसाठीचा ‘प्रोटोकॉल’ पाळल्याने त्यांच्याप्रती कुतूहल व्यक्त करण्यात आले. आ. रमेश बुंदिले यांना राज्यपालांच्या कार्यक्रमात खुर्चीसाठी ताटकळत रहावे लागल्याने ही बाब धारणीत चर्चिली गेली. (प्रतिनिधी)