अखेर वादग्रस्त भामकर हॉस्पिटलमधील कोविड सेंटरला लागले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:53+5:302021-06-02T04:11:53+5:30
परतवाडा : शहरालगतच्या देवमाळी स्थित भामकर हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोविड सेंटर बंद करण्याचे पत्र हॉस्पिटलच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान ...

अखेर वादग्रस्त भामकर हॉस्पिटलमधील कोविड सेंटरला लागले टाळे
परतवाडा : शहरालगतच्या देवमाळी स्थित भामकर हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोविड सेंटर बंद करण्याचे पत्र हॉस्पिटलच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान संबंधित दवाखान्यात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा वसूल करण्यात आलेले बिल आणि मृत्यू संदर्भात एका समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भामकर हॉस्पिटलमध्ये डॉ. अरविंद भामकर, डॉ. आशिष भन्साली, डॉ. हेमंत चिमोटे व डॉ मंगेश भगत यांनी तीन महिन्यांपासून कोरोनाग्रस्त सहाशेहून अधिक रुग्णांवर उपचार केले. दरम्यान रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा देयके आकारण्यात आली. पाहिजे त्या प्रमाणात सुविधा पुरविल्या नाहीत. दुसरीकडे पीपीई कीट न देता हजारो रुपये घेतल्या गेले. एकाच खोलीत चार रुग्ण ठेवून प्रत्येकाकडून स्वतंत्र खोलीचे भाडेसुद्धा घेण्यात आले. अशा अनेक प्रकारचे गंभीर आरोप रुग्णांनी तक्रारीद्वारे जिल्हाधिकारी व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केले होते. रुग्ण रामदास आवारे व इतर रुग्णांकडून उकळलेल्या देयकाविरुद्ध रुग्णाचे नातेवाईक रुपा आवारे यांनी कारवाईची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रनमले यांनी तपासणी केली असता, त्यात अनेक गंभीर बाबी आढळल्याची माहिती पुढे आली आहे.
बॉक्स
कारवाईच्या भीतीने रुग्णालय बंदचे पत्र
रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यासह आवश्यक सोयी-सुविधा न मिळाल्याने झालेल्या तक्रारी पाहता कारवाईच्या भीतीने कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, दुसरीकडे रुग्णसंख्या कमी झाल्याने कोविड सेंटर बंद करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे डॉ. अरविंद भामकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोट
भामकर हॉस्पिटलसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. चौकशी पथक नेमून लूटमार करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांची पाठ थोपाटू. कोविड सेंटर बंद झाले, तरी चौकशी करू. चौकशीत दोषी आढळल्यास हातात बेड्या ठोकू.
- बच्चू कडू,
शालेय शिक्षण राज्यमंत्री