मोर्शी : कमी खर्चात हमखास उत्पन्न अपेक्षित असलेल्या तुरीवर अज्ञात रोगाने थैमान घातल्याने ते पीक वाळत असल्याने तुरीच्या उत्पन्नात कमालीची घट येणार आहे. या भरवशाच्या पिकानेही शेतकऱ्याच्या हाती तुरी दिल्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी शेतकरी सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीचे पिकात तुरीच्या ओळी पेरून पीक घेतात. याशिवाय सलग पेरणीही केली जाते. खरिपातील तिमाही तसेच कापसातील तूट तूर पिकामुळे आजपर्यंत भरून निघत होती. नाफेडमार्फत होणारी खरेदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत होती. परंतु, यावर्षी आलेल्या या रोगाने तुरीचे पीक अवकाळी वाळायला लागले आहे. वाळवी किंवा उधळीमुळे शेंगा येण्यापूर्वी तुरीचे उभे पीक वाळते. पण, सध्या शेंगांच वाळत आहेत. यामुळे दाणे बारीक होत असून, उत्पन्नात कमालीची घट येणार आहे .
कृषी विभागाच्या मते, हा मर रोग असून, एकच पीक वारंवार घेतल्यामुळे येते, असे म्हणणे आहे. पण, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पेरणीपूर्वी होणे अपेक्षित आहे. दिवसेंदिवस प्रत्येक पिकांवर रोगाने आक्रमक करणे सुरू केले आहे .सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या विळख्यात आली आहे. आजवर तुरीवर आशा होती, तिही आता धुळीस मिळाली आहे