उमलण्यापूर्वीच तिच्या स्वप्नांचा चुराडा!
By Admin | Updated: August 13, 2014 23:34 IST2014-08-13T23:34:43+5:302014-08-13T23:34:43+5:30
अज्ञान आणि निरक्षरतेच्या गर्तेतून बाहेर पडावे.कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, प्रतिष्ठा मिळवून द्यावी, हे तिचे स्वप्न. पण, त्यासाठी ज्ञानार्जन महत्त्वाचे. चिखलदरा तालुक्यातील जामली

उमलण्यापूर्वीच तिच्या स्वप्नांचा चुराडा!
काळाचा घाला : आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू
अमरावती :अज्ञान आणि निरक्षरतेच्या गर्तेतून बाहेर पडावे.कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, प्रतिष्ठा मिळवून द्यावी, हे तिचे स्वप्न. पण, त्यासाठी ज्ञानार्जन महत्त्वाचे. चिखलदरा तालुक्यातील जामली या अतिदुर्गम गावातून शिक्षणासाठी ती शहरात आली. काहीशी बुजलेली. शहराच्या वातावरणात येऊन अवघा पंधरवाडा लोटला असेल तोच काळाने घाला घातला अन् तिच्या स्वप्नांची पिसे इस्तत: विखुरली.
सरिता जामुनकर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव. ती मूळची चिखलदरा तालुक्यातील जामली या आदिवासी खेड्यातील रहिवासी. वडील शेती व्यवसाय करतात. पाच बहिणी,एक भाऊ व आई-वडील अशी कुटुंबातील सदस्य संख्या. यातील दोन बहिणींचे लग्न होऊन त्या आपापल्या घरी गेलेल्या. यातील मोठी बहीण येथील कॅम्पस्थित पोलीस वसाहतीत राहते. जावई बेलसरे हे गाडगेनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सरिता कुटुंबात सर्वात लहान.
घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून सरिताने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण चांदूरबाजार तालुक्यातील कारंजा बहिरम येथे घेतले. तिथे ती आदिवासी आश्रमशाळेतच राहायची. बारावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सरिताने पुढील शिक्षण समाज कार्यात घेण्याचा निर्णय घेतला.