जरी का इमामवाड्यात भजनाची परंपरा कायम

By Admin | Updated: August 7, 2015 00:30 IST2015-08-07T00:30:41+5:302015-08-07T00:30:41+5:30

येथील ‘जरी का इमामवाड्यात’ गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा व भजन केले जाते. ही परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे.

Even in Imamwada, there is a tradition of worship | जरी का इमामवाड्यात भजनाची परंपरा कायम

जरी का इमामवाड्यात भजनाची परंपरा कायम

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक : यावर्षी पोलीस बंदोबस्त नाही
सुनील देशपांडे  अचलपूर
येथील ‘जरी का इमामवाड्यात’ गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा व भजन केले जाते. ही परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरत आहे.
गुरु परंपरेनुसार अचलपूर येथील हिरापुरा भागातील हिंदूधर्मीय भजनी मंडळीने तपकिरी रंगाच्या भल्या मोठ्या काठीला लावलेल्या झेंड्याची मिरवणूक हिरापुरा देवडी, बुद्धेखां चौक ते इमामवाड्यापर्यंत भजनाच्या तालावर काढली. इमामवाड्यात गेल्यावर तेथे असलेल्या बेगाबाई, बादशहा यासह पाच समाध्यांची (कबरीचे) हिंदू धर्माच्या प्रथेनुसार पूजाअर्चा करून आरती म्हटली जाते. या अगोदर समाधीस्थळी भजने म्हटली जातात. या कार्यक्रमात २०० पेक्षा अधिक लोक सहभागी होतात. दरवर्षी या मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त असतो. परंतु यंदा अचलपूर पोलीस ठाण्याला कार्यक्रमाची माहिती दिल्यावरही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नव्हता.
आख्यायिका सांगताना हिरापुरा भागातील रहिवासी प्रल्हादराव अग्राये, सुरेश आकोलकर म्हणाले की, सुमारे ३०० वर्षांपूर्वी सापन नदीच्या तिरावर गांधी पुलाच्या बाजूला असलेल्या ‘जरी का इमामवाड्या’त एक मुस्लिम बादशाहा राहत होता. त्याकाळी सापन नदीला महापूर येत असे. नदीच्या पलीकडे तापी महाराजांचा मठ आहे. त्या मठात साधूसंत निवास करीत असत. त्याच मठात बेगाबाई नामक तपस्वीनी रहात होती. तिला एक मुलगा होता. ती अप्रतिम सुंदर होती. तिने कठोर तपश्चर्येने आध्यात्मिक शक्ती आत्मसात केली होती. बेगाबाई सापन नदीच्या काठावर फिरायला येत असे. ती नेहमी देवाच्या नामस्मरणात मग्न राहत असे एकदा ती फिरत फिरत हिरापुऱ्यात आली तेथे भजन सुरू होते ते भजन तिने ऐकले व मठात निघून गेली. काही दिवसानंतर बेगाबाई नदीच्या पलीकडे गेली तेव्हा नदीला पाणी नव्हते. परंतु जेव्हा ती परत जायला निघाली तेव्हा नदीला मोठा पूर आलेला होता. म्हणून बेगाबाई किनाऱ्यावरील ‘जरी का इमामवाडा’ येथे थांबली. नदीचा पूर उतरत नसल्याने तिला मुक्काम येथेच करावा लागला. तेव्हा बादशहाची वाईट नजर तिच्यावर पडली. बादशहाने तिला जेवणासाठी ताटात कापडाने झाकून गाईच्या मांसाचे तुकडे आणले तिने जेव्हा कापड काढले तेव्हा त्या मासाची कमळाची फुले झाली. ते पाहून बादशहाला आश्चर्य वाटले. त्याने बेगाबाईला आपलेसे करण्याकरीता वाईट कृत्य करण्यास सुरूवात केली असता बेगाबाईने परमेश्वराचा धावा केला. लगेच ती हळूहळू धरणी मातेच्या उदरात समाविष्ट होत गेली. त्यावेळी बादशहाने तिचे केस हातात घट्ट पकडले. बादशहाच्या हातात तिचे केस आले. तिने शेवटच्या क्षणी बादशहाला सांगितले की, हे माझे केस हिरापुरा येथील दिंडी-भजन वाल्यांना नेऊन दे आणि त्यांना सांग की वर्षातून एकदा गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी माझ्या समाधीवर भजन करत जा. बादशहाला पश्चाताप झाला.

Web Title: Even in Imamwada, there is a tradition of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.