भय संपेना, बिबट्याचा थांगपत्ता लागेना... अडीच महिन्यांनंतरही बहिरममध्ये दहशत
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 16, 2023 15:39 IST2023-10-16T15:38:18+5:302023-10-16T15:39:05+5:30
तब्बल ११ वेळा दिसल्याची नोंद

भय संपेना, बिबट्याचा थांगपत्ता लागेना... अडीच महिन्यांनंतरही बहिरममध्ये दहशत
परतवाडा (अमरावती) : श्री सिद्ध क्षेत्र बहिरममध्ये अडीच महिन्यांनंतरही बिबट्याची दहशत कायम आहे. बहिरम येथील सीताफळ बनाचा लिलाव घेणाऱ्या व्यापाऱ्याला व त्याच्या कार्यकर्त्यांना सोमवारला हा बिबट दिसल्यामुळे प्रशासकीय स्तरावरही त्या बिबट्याची दहशत बघायला मिळाली. काही दिवसांपूर्वी हाच बिबट बहिरम येथील आंतरराज्य चेक पोस्टवर कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सीताफळ बनाचा लिलाव घेणाऱ्या व्यापाऱ्याला व कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी बिबट दिसला ते ठिकाण स्वतः त्यांनी सोमवार, दि. १६ ऑक्टोबरला दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखविले. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याच्या पायांचे ठसे आपल्या मोबाइलमध्ये कैद केले.
१ ऑक्टोबरपर्यंत वनविभागाकडून या बिबट्याच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने कुठलीही उपाययोजना केली गेली नाही. यापूर्वी २ ऑगस्टला बिबट बहिरम मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर तब्बल ११ वेळा या बिबट्याने लोकांना दर्शन दिले.