तक्रारीनंतरही चिंचेच्या महाकाय वृक्षाची कत्तल
By Admin | Updated: October 8, 2015 00:10 IST2015-10-08T00:10:01+5:302015-10-08T00:10:01+5:30
दर्यापूर नगर पालिकेच्या हद्दीतील स्थानिक आठवडी बाजारातील शासकीय गोदामाजवळ अज्ञाताने २०० ेवर्षांपूर्वीच्या चिंचेच्या महाकाय झाडाची हळूहळू करीत कत्तल केली.

तक्रारीनंतरही चिंचेच्या महाकाय वृक्षाची कत्तल
दर्यापूर येथील प्रकार : दोषींवर कारवाईची मागणी
उमेश होले दर्यापूर
दर्यापूर नगर पालिकेच्या हद्दीतील स्थानिक आठवडी बाजारातील शासकीय गोदामाजवळ अज्ञाताने २०० ेवर्षांपूर्वीच्या चिंचेच्या महाकाय झाडाची हळूहळू करीत कत्तल केली. सदर इसम झाड तोडत असल्याची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर हे झाड त्या इसमाने जमीनदोस्त केले.
स्थानिक आठवडी बाजारात भले मोठे चिंचेचे झाड होते. त्या झाडाची सावली अनेक वर्षे वयोवृध्दांनी व लहान मुलांनी अनुभवली. परंतु येथीलच एका व्यक्तीला घराचा दुसरा माळा बांधताना हे झाड अडसर करीत असल्याने त्याने हळूहळू करून ते जमीनदोस्त करण्यास सुरूवात केली होती. चार दिवसांपूर्वी त्याने या झाडाच्या फांद्या कापल्या व झाड तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा याबाबतची माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य समन्वयक शेखर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन येथील उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना ही माहिती दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी लगेच सबंधित मंडळ अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठविले. इतकेच नव्हे, तर मुख्याधिकाऱ्यांनी देखील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तरीही त्या व्यक्तीला झाड तोडण्यापासून रोखले गेले नाही. शेवटी चिंचेचा महाकाय वृक्ष भुईसपाट झाला. खरे तर प्रशासनाने या वृक्षाचा त्वरित पंचनामा करून सबंधितांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. अज्ञाताने हे झाड स्वार्थासाठी तोडून परस्पर विकल्याची परिसरात चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनातील जो कुणी दोषी असेल त्याच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)