पुत्रवियोगानंतरही ‘त्या’ माऊलीने जपले समाजभान!
By Admin | Updated: July 30, 2016 00:02 IST2016-07-30T00:02:06+5:302016-07-30T00:02:06+5:30
मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे.

पुत्रवियोगानंतरही ‘त्या’ माऊलीने जपले समाजभान!
रूढी-परंपरांना फाटा : गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
अमरावती : मातृहृदय प्रचंड हळवे असते म्हणतात. आईचा जीव तिच्या मुलांमध्येच गुंतलेला असतोे. मुलाच्या वियोेगाचे दु:ख पचविण्याची वेळ एखाद्या आईवर आली तर ती कोलमडून पडते. पण, येथील एका माऊलीने मात्र, पुत्रवियोगानंतरही सामाजिक भान कायम ठेवले आणि मुलाच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा अनोखा पायंडा पाडला.
नलिनी किशोर तायडे असे या दु:खी माऊलीचे नाव आहे. स्थानिक चपराशीपुऱ्यात त्यांचे घर. चांदूररेल्वे तालुक्यातील कृषी विभागामध्ये त्या शिपाई पदावर कार्यरत आहेत. आर्थिक स्थितीही बेताचीच. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरी दोन मुले व मुलगी. परंतु नियती एवढ्यावरच थांबली नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांचा मोठा मुलगा धीरज याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले.
उपचार केलेत. परंतु त्याने या जगाचा निरोप घेतला. पतीनिधनाचे दु:ख पचवून कशीबशी सावरलेली ही माऊली पुन्हा कोलमडून पडली. जगण्याचा आधारच निघून गेला. परंतु मुळातच खंबीरपणा अंगी असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. थरथरणाऱ्या पावलांनी त्या पुन्हा उभ्या ठाकल्यात. कुटुंबाला धीर दिला.
समाजासमोर ठेवला आदर्श
अमरावती : नलिनीताई दरवर्षी २५ जुलै रोजी मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ चपराशीपुऱ्यातील महिंद्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या-पुस्तकांचे वाटप करतात. समाजात स्वत:ची इवली-इवली दु:खे वर्षानुवर्षे कुरवाळत बसणारे अनेक लोक आपण अवतीभवती पाहतो. पण, दु:खाच्या कोषातून बाहेर पडून दुसऱ्यांचे दु:ख जाणून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नलिनीताई या विरळ्याच. नलिनीतार्इंचा ‘धीरज’ कॅन्सरने ओढून नेला असला तरी त्याच्या स्मृती आणि मुलगी तसेच धाकटा मुलगा स्वप्नील यांच्या आधाराने त्या आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या देखील धिरोदात्तपणे पेलत आहेत. (प्रतिनिधी)
इतरांनी घ्यावा आदर्श
आधी पतीचे निधन आणि मग जगण्याचा आधार असलेला मुलगा गमावल्यानंतरही नलिनीताई खंबीर राहिल्या. नेटाने त्यांनी संसार रेटला. फारसे शिक्षणही नाही आणि आर्थिक स्त्रोतही बळकट नाहीत. पण, समाजासाठी काही तरी करण्याची ईच्छा मात्र प्रबळ. त्यामुळेच कर्मकांडाला फाटा देऊन गरजू विद्यार्थ्यांना जमेल तसे शालेय साहित्य पुरविण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दरवर्षी मुलाच्या स्मृतीदिनी त्या हा उपक्रम राबवितात.