वनपर्यटन केंद्राची होणार स्थापना

By Admin | Updated: July 8, 2015 00:32 IST2015-07-08T00:32:56+5:302015-07-08T00:32:56+5:30

विभागाचे मुख्यालय असतानाही अंबानगरीत उद्यानांची कमतरता असल्याने शहरात आता नवीन वनपर्यटन केंद्राची स्थापना केली जाणार आहे.

Establishment of a Tourism Center | वनपर्यटन केंद्राची होणार स्थापना

वनपर्यटन केंद्राची होणार स्थापना

हालचाली सुरू : अंबानगरीच्या वडाळी परिसरात जागा निश्चित
अमरावती : विभागाचे मुख्यालय असतानाही अंबानगरीत उद्यानांची कमतरता असल्याने शहरात आता नवीन वनपर्यटन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून वडाळीतील सुमारे ४० हेक्टर जागेवर हा मनोरंजन पार्क उभारला जाणार आहे.
सुट्यांच्या कालावधीत फिरण्यासाठी आणि विरंगुळाच्या दृष्टीने अमरावतीकरांना शहराजवळच निसर्गरम्य स्थळ उपलब्ध होणार आहे. या पार्ककरिता सुमारे ५.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वनविभाग, महसूल आणि महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून या पर्यटन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. वडाळी हा परिसर सुरुवातीपासूनच निसर्गरम्य स्थळ म्हणून ओळखला जातो. या भागात वनविभागाची बरीच मोठी जागा आहे. वडाळी येथे पूर्वी वनविभागाचे उद्यानही होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्या भागात कुणीही फिरकत नाही. अशातच वडाळी तलावाजवळील उद्यानाला मर्यादा आहेत.
तीन महिन्यांपूर्वी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात एक बैठक पार पडली आहे. वनविभाग, महसूल विभाग आणि महापालिका मिळून या पर्यटन केंद्रांची स्थापना होणार असून यासाठी पाच कोटी १६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
येत्या दोन वर्षांत हे पर्यटन कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पंचवीस एकर जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवार ३ जुलै रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. याकरिता १८ लाख रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या पर्यटन स्थळासाठी पुढाकार घेतला आहे, हे विशेष. (प्रतिनिधी)

अशा आहेत तरतुदी
पर्यटन केंद्र कुंपणासाठी ४५ लाख, जमीन सपाटीकरण २५ लाख, सिंचन सुविधेसाठी ५० लाख, वनौषधी उद्यानासाठी १.२० कोटी, विद्युतीकरण ४० लाख, रस्ते विकास २० लाख, निरीक्षण मनोऱ्याकरिता १५ लाख, जल व मृदसंधारणाकरिता ५० लाख याप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्याला संपन्न असा कला व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. रम्य नैसर्गिक स्थळांचे वैविध्य राहणीमान, हस्तकला, यात्रा आणि उत्सवांची परंपरा येथे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती.

Web Title: Establishment of a Tourism Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.